सटाणा : गेल्या दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी, मार्च महिन्यात झालेल्या गारपीट, अवकाळी पावसामुळे बागलाण तालुक्यात पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून शासनाने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जावरील व्याज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून तालुक्यातील ५१३७ शेतकरी सभासदांच्या खात्यावर ८६ लाख २० हजार रुपये व्याजाची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे संचालक सचिन सावंत यांनी दिली.बागलाण तालुक्यात फेब्रुवारी, मार्च २०१४मध्ये झालेल्या गारपीट, अवकाळी पावसामुळे डाळींब, द्राक्ष, कांदा, गहू , हरभरा पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले होते. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक कचाट्यात सापडला होता. सहकारी संस्थांमार्फत जिल्हा बँकेकडून घेतलेले पीक कर्जदेखील फेडणे शेतकऱ्यांना मुश्कील होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पीक कर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून, जिल्हा बँकेच्या सटाणा विभागातील दोन हजार ६३ व नामपूर विभागातील तीन हजार १०४ सभासदांना व्याज माफीचा लाभ मिळणार आहे. या शेतकरी सभासदांच्या व्याजमाफीपोटी ८६ लाख २० हजार ९४७ रु पयांचे अनुदान प्राप्त झाले असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांनी नजीकच्या बँक शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक सावंत यांनी केले आहे. (वार्ताहर)
८६ लाखांचे व्याजमाफी अनुदान प्राप्त
By admin | Updated: January 5, 2016 22:02 IST