औद्योगिक विकासाचा पुनश्च ‘हरिओम’ (सिन्नर वर्धापनदिन ६)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:13 AM2021-07-25T04:13:20+5:302021-07-25T04:13:20+5:30

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी सिन्नरचा झालेला समावेश आणि येऊ घातलेल्या उद्योगांसाठी वैतरणा दमणगंगामधून राखीव पाण्याचे करण्यात आलेले नियोजन ...

Re-Hariom of Industrial Development (Sinnar Anniversary 6) | औद्योगिक विकासाचा पुनश्च ‘हरिओम’ (सिन्नर वर्धापनदिन ६)

औद्योगिक विकासाचा पुनश्च ‘हरिओम’ (सिन्नर वर्धापनदिन ६)

Next

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी सिन्नरचा झालेला समावेश आणि येऊ घातलेल्या उद्योगांसाठी वैतरणा दमणगंगामधून राखीव पाण्याचे करण्यात आलेले नियोजन यामुळे सिन्नरच्या औद्योगिक विकासाचा पुनश्च हरिओम झाल्याचे निश्चितपणे मानले जात आहे. या घडामोडींमुळे उद्योग वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाणीटंचाई, कुशल कामगार आणि विविध समस्यांमुळे गेल्या सुमारे दशकभरापासून सिन्नरच्या औद्योगिक विकासात निर्माण झालेला अडथळा दूर होत आहे. आरंभीच्या काळात भरवेगाने सिन्नरचा झालेला औद्योगिक विकास, त्या अनुषंगाने मुंबई, गुजरातसह परराज्यातून सिन्नरच्या जमिनीमध्ये करण्यात आलेली प्रचंड प्रमाणातील गुंतवणूक यामुळे सिन्नरमध्ये तेजीचे वारे सर्वच क्षेत्रात वाहत होते; मात्र इंडियाबुल्स प्रकल्प स्थगित झाल्यानंतर उंचीवर गेलेली तेजी जमिनीवर आदळली. गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात सिन्नरमधील अनेक गुंतवणूकदार व मध्यस्थ अडचणीत सापडले. बाहेरून रोजगारासाठी आलेल्या कामगार व अनुषंगिक व्यावसायिक आल्या पावली माघारी परतले. दूध, भाजीपाला, किराणा अशा अनेक स्थानिक व्यावसायिकांचे वृद्धिंगत झालेले व्यवसाय मंदीच्या तावडीत सापडले होते. औद्योगिक विकासातील अडथळा अनेकांना विकासाची दारे बंद करून गेला होता. परिणामी गेले दशकभर सिन्नर तालुक्यात मरगळ निर्माण झाली होती. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे त्याची कोंडी आता नक्की फुटेल व विकासाची द्वारे खुली होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

दिल्ली-मुंबई कॉरिडॉर हा केंद्र शासनाने परदेशी भागीदारांच्या साहाय्याने पुढाकार घेतलेला प्रकल्प असल्याने हा प्रकल्प विनाअडथळा उभा राहील असा विश्वास उद्योग वर्तुळातून व्यक्त केला जातो. त्यामुळे विकासाची निश्चित ग्वाही यातून मिळाली असल्याची भावना आहे. या महत्त्वाच्या घोषणेसोबतच येथील औद्योगिक विकासाला मोठा वेग येईल असे अनेक पायाभूत प्रकल्प सिन्नरमध्ये उभे राहत आहेत किंवा थोड्याच अवधीत सुरू होत आहेत. या सगळ्यांचा एकत्रित विचार केल्यास आगामी काळात विकासाच्या बाबतीत सिन्नर मोठी भरारी घेईल असे संकेत मिळत आहेत.

नाशिक महानगरात औद्योगिक विकासासाठी यापुढे जमीन उपलब्ध नाही. त्यामुळे १९८५ पासूनच सिन्नरमध्ये औद्योगिकीकरणास सुरुवात झाली. माजी आमदार सूर्यभान गडाख यांनी स्थापन केलेली सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत कमालीची यशस्वी झाली. त्यातून सिन्नरच्या औद्योगिक विकासाला दिशा मिळाली. पाठोपाठ तुकाराम दिघोळे यांच्या प्रयत्नाने मालेगाव येथे एमआयडीसीने औद्योगिक वसाहत उभारली. यानंतर सिन्नर येथे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीची घोषणा केली होती. मात्र सत्ता बदल झाल्यानंतर ही घोषणा कागदावरच राहिली. मधल्या काळात वाढीव उद्योग क्षेत्राचा नकाशा एमआयडीसीने तयार केला. त्यात दातली खोपडीपासून बारागाव पिंप्रीपर्यंत अनेक गावातील शेतजमिनींवर औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव अशा नोंदी करण्यात आल्याने शेतकऱ्यात खळबळ माजली होती तर उद्योग क्षेत्रात विकासाचा उत्साह संचारला होता. मात्र थोड्या कालावधीत औद्योगिक विस्ताराचे वारे आले तसेच शमले. मुसळगाव व गुळवंच या दोन्ही गावांमध्ये हजारभर एकरावर इंडियाबुल्सचे औष्णिक विद्युत केंद्र आणि उभे राहणाऱ्या उद्योगांसाठी शेकडो भूखंड तयार झाले तेव्हा विकास पर्व सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र पाच वर्षातच ते धूसर झाले होते. अशा निराशाजनक अनेक गोष्टी घडल्या तरी औद्योगिक विकासाचा सिन्नरकरांचा दावा मात्र कायम राहिला तो सिन्नरच्या भौगोलिक महत्त्वामुळे. महाराष्ट्रातील औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे व औरंगाबाद या मुख्य शहरांपासून सिन्नर दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या विकास केंद्रांची सिन्नरचा सहज संपर्क होऊ शकतो. मुसळगाव व माळेगाव येथील औद्योगिकीकरणामुळे सिन्नरला औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या आहेत. या विकास केंद्रांमध्ये औद्योगिक विकासाला मर्यादा आल्यामुळे व सिन्नर परिसरात औद्योगिकीकरणासाठी जमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे सिन्नरकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. मुंबई- पुणे औरंगाबाद या विकासाच्या त्रिकोणाची केली जाणारी भाषा त्यात सिन्नर जोडले गेल्याने विकासाचा चतुष्कोन अशा परिभाषेत बदलली आहे. सिन्नरचे भौगोलिक महत्त्व त्यास कारणीभूत ठरले आहे. सिन्नरपासून नाशिक रोड रेल्वे स्टेशन अर्धा तासाच्या अंतरावर आहे. तेथून सर्व दिशांना जाणारी व कनेक्टिव्हिटी असणारी रेल्वेसेवा उपलब्ध असल्याने सिन्नरला येऊ पाहणाऱ्यांना रेल्वे प्रवास सोयीचा झाला आहे. शिर्डी येथेही रेल्वे प्रवास सुविधा विस्तारत आहे. तर नाशिक- पुणे रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. या स्थितीत सिन्नर रेल्वेमार्गाने निश्चित स्वरूपात जोडले जाणार आहे ही बाब औद्योगिक दळणवळणासाठी उपयुक्त ठरणारी आहे.

मुंबई, नागपूर या मोठ्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम विनाखंड प्रगतिपथावर आहे. समृद्धी महामार्गावर सिन्नर वसलेले असल्याने औद्योगिक रस्ता दळणवळणासाठी सिन्नरचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. औद्योगिक विकासासाठी हा मार्ग निश्चितच समृद्धीचा मार्ग ठरणार आहे.

रखडलेला इंडियाबुल्स प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी शासकीय स्तरावर विचार विनिमय केला जात आहे. या सगळ्या सकारात्मक गोष्टींचा विचार करता सिन्नरच्या विकासातील अडथळे लवकरच दूर होतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. सिन्नरच्या औद्योगिक पुनश्च हरिओम झाला असून प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.

Web Title: Re-Hariom of Industrial Development (Sinnar Anniversary 6)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.