लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : स्वामी नारायण मंदिरात सुरू असलेल्या सद्गुरू वंदना महोत्सवांतर्गत मंगळवारी (दि.८) देशभरातील भाविकांच्या उपस्थितीत रुक्मिणी स्वयंवर सोहळा रंगला. यावेळी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढून भाविकांनी ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरला. रुक्मिणी स्वयंवरासाठी गुजरातमधून सुमारे २५० संतांनी सहभाग घेत विवाह सोहळ्याची शोभा वाढविली, तत्पूर्वी मुख्य निवासस्थानापासून विवाह सोहळ्यासाठी तयार करण्यात आलेल्या भव्य मंडपाच्या प्रवेशद्वारापर्यंत श्रीकृष्णाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीवर अमृतसागर स्वामी यांच्यातर्फे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये अमित तथा हारमनी ग्रुपच्या ठेक्यावर धमाल दांडिया रंगला. या दांडिया रासमध्ये नाशिकसह गुजरात व देशभरातून आलेल्या भाविकांनी सहभाग घेत मनमुराद दांडियाचा आनंद लुटला. दरम्यान, दुपारच्या सत्रात नियमित भागवत पोथीचे पारायण व दत्तक बालकांना विद्यादान उपक्रमांतर्गत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. उद्या या महोत्सवाचा समारोप होणार असून, त्यापूर्वी सकाळी ११.३० वाजता भागवत कथा पूर्णाहुती व दुपारी १ वाजता यज्ञ पूर्णाहुती देऊन सद्गुरू वंदना महोत्सवाची सांगता होणार आहे. सद्गुरु वंदना महोत्सव रंगलेल्या रुक्मिणी स्वयंवर सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अत्यंत राजेशाही निघालेल्या मिरवणुकीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सायंकाळी रंगलेल्या दांडिया सोहळ्यातही भाविकांनी भक्तिरसात तल्लीन होत आनंद लुटला. दरम्यान, या महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या आरोग्य शिबिराचाही भाविक लाभ घेत आहे. त्याप्रमाणे रक्तदान शिबिरातही भाविकांची गर्दी होत आहे. या सोहळ्यासाठी भारतातील विविध प्रांतांमधून भाविक दाखल झाले आहेत.
सद्गुरू महोत्सवात रंगला रुक्मिणी स्वयंवर सोहळा
By admin | Updated: May 10, 2017 00:57 IST