नाशिक : शहरातील राजलक्ष्मी नागरी सहकारी बॅँकेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत काही संचालकांनी आक्षेप घेतल्यानंतर आता आपसातील कुरबुरी सहकार खात्यापर्यंत पोहोचल्या असून, व्यवहार अनियमितप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बॅँकेने नियुक्त केलेले मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर अहेर हे बॅँकेचे अध्यक्ष डॉ. राहुल अहेर यांचे काका असून, त्यांच्या कारभारावर आक्षेप होत असताना काकांना वाचविण्यासाठी पुढाकार घेतल्याची तक्रार आहे. त्यातून आता संचालकांमध्येही दोन गट पडले आहेत.नाशिकमधील राजलक्ष्मी बॅँक ही सध्या आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या नेतृत्वाखाली आहे. तत्पूर्वी ती त्यांचे पिता तथा माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांच्या अधिपत्याखाली होती. त्यावेळी बॅँकेत अशा प्रकारचे वाद विवाद नव्हते. तथापि, सध्या बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बॅँकेचे अध्यक्ष डॉ. राहुल अहेर यांचे काका भास्करराव अहेर यांना नियुक्त केल्यापासून वादाला सुरुवात झाली आहे. राज्य शिखर बॅँकेतील सेवेचा ‘अनुभव’ गाठीशी असलेल्या भास्कर अहेर यांनी आपल्या पद्धतीने बॅँक राबविण्यास सुरुवात केली आणि संचालकांची पत्रास बाळगली नाही तेव्हापासून बॅँकेत उणेदुणे वाढत गेले, असे तक्रारकर्त्या संचालकांचे म्हणणे आहे. सध्या आमदारकी भूषवित असलेल्या अध्यक्ष महोदयांना बॅँकेत लक्ष घालण्यास वेळ नाही आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संचालकांचे ऐकून न घेता बरे वाईट कारभार करीत आहेत, अशा प्रकारच्या तक्रारी संचालकांमध्येच वाढल्यानंतर संचालकांनी अंतर्गतच एक समिती स्थापन करून कारभाराची चौकशी केल्याचे वृत्त आहे. या समितीच्या अध्यक्षांनी त्यावर स्वाक्षरी न केलेला अहवाल अन्य संचालकांच्या बैठकीत उघड झाल्यानंतर बॅँकेच्या अध्यक्षांना बॅँकेत ‘कुछ तो गडबड है’ असे अवगत करण्यात आले, परंतु त्यानंतर काकांच्या कारभारावर पांघरूण घालत असल्याचे काही संचालकांचे म्हणणे असून त्यामुळेच माजी अध्यक्ष राहिलेल्या संचालकांसह काहींनी विद्यमान अध्यक्षांना पत्र देऊन बॅँकेत अशाप्रकारच्या सुरू असलेल्या कारभाराला आपण जबाबदार राहणार नाही, असे सांगून कारभारातून सुटकेचा मार्ग निवडला आहे. संचालकांचा या बेबनावातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामकाजाविषयी थेट सहकार खात्याकडे तक्रारी करण्यात आल्या असून, सहकार उपनिबंधकांनी विशेष अधिकारी नियुक्त करून त्याची चौकशी सुरू केल्याचे वृत्त आहे. आत्तापर्यत एक ते दोन वेळा संबंधिताना चौकशीसाठी पाचारण केल्याचेही वृत्त आहे. बॅँकेतील कर्जवाटप, संचालकांशी वागणूक, निवडणुकीच्या दिवशी बॅँकेत शिल्लक कॅश कमी भरणे अशा प्रकारचा आरोप असून, आता संचालकांनी थेट अध्यक्षांनाच आव्हान दिल्याने बॅँक वादात सापडली आहे. (प्रतिनिधी)
‘राजलक्ष्मी’ बँकेत बेबनाव
By admin | Updated: October 11, 2015 00:02 IST