शेखर देसाई, लासलगाव : नाव राजेश शिवनाथ चव्हाण. बाकी काही सांगता येत नाही. वडाळी भोईजवळ केदराई फाट्याजवळ झालेल्या अपघातात तो जखमी झाला. त्याची स्मृती हरपली आहे. अशा बिकट अवस्थेत पिंपळगाव बसवंत येथून चांदवड कडे मोटार सायकलवर जाणाऱ्या नवनाथ जराड यांच्या नजरेस तो पडतो आणि त्याची स्थिती पाहून त्यांचा पायच पुढे निघेना. शून्यात नजर टाकून बसलेल्या या माणसाला रस्त्यावर मध्येच कसे सोडायचे या काळजीने जराड सहा सीटर रिक्षा आणून त्याला घेऊन जातात ते आपल्या लासलगाव जवळ असलेल्या शिरसगाव लौकी येथील सैंगॠषी वृध्दाश्रमात. आता राजेशचा शोध घेत कोणी आले तर ठिक अन्यथा राजेश शिवनाथ चव्हाण, मुक्काम पोस्ट सेंगऋषी आश्रम, शिरसगाव लौकी, लासलगाव येथे आणखी एका नव्या जीवनाचा अध्याय सुरू झाला आहे.वृद्धाश्रमाचे संस्थापक नवनाथ जराड यांनी आजवर अनेक निराधारांना मदतीचा हात दिलेला आहे. त्यात राजेशची भर पडली आहे. रस्त्यावर एका बाजूला पडून राहिलेल्या राजेशच्या अवस्थेने त्यांचे मन हेलावले आणि त्यांनी सहा सीटर रिक्षा बोलावून त्यातून राजेशला वृद्धाश्रमात नेले. राजेशला वृद्धाश्रमात आणल्यानंतर नवनाथ आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रियंका जराड यांनी राजेशची स्वच्छता केली. त्याला आंघोळ घालत त्याला पोटभर जेऊ घातले. चांगले कपडे घालायला दिले. गेली काही दिवस जिणे हैराण झालेल्या राजेशला त्याचे नाव सांगण्यापलिकडे बाकी काही सांगता येत नाही . मात्र, जराड यांच्या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून त्याला एक छप्पर मिळाले. राजेशच्या कुटुंबीयांचा थांगपत्ता लागला अथवा त्याच्या शोधात कुणी नातेवाईक आले तर ठिक अन्यथा सेंगऋषी आश्रम हेच त्याचे घर बनणार आहे.
स्मृती हरपलेल्या राजेशला मिळाले छप्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 17:08 IST
शुभवर्तमान : जराड यांच्या वृद्धाश्रमात मिळाला आधार
स्मृती हरपलेल्या राजेशला मिळाले छप्पर
ठळक मुद्देराजेशला वृद्धाश्रमात आणल्यानंतर नवनाथ आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रियंका जराड यांनी राजेशची स्वच्छता केली