आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटनेत शाखाध्यक्षांच्या नेमणुका करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर गुरुवारी (दि.२३) येथील हॉटेल एसएसके येथे झालेल्या शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांच्या हस्ते नूतन शाखाध्यक्षांना तसेच विभाग अध्यक्षांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. बंद खोलीत झालेल्या कार्यक्रमात राज यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नवे-जुने वादावरून कानपिचक्या देतानाच पक्षशिस्त राखलीच पाहिजे, असे मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर युवा नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, माजी महापौर अशोक मुर्तडक यांंच्यासह दिलीप दातीर, अंकुश पवार, रतनकुमार इचम, अनंता सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पक्षातील नवा-जुना वाद टाळण्यावर भर देताना घरात लहान मूल आल्यानंतर त्याचे लाड करतो की बाजूला सारतो, असा प्रश्न त्यांनी केला आणि असा वाद टाळण्याचे आवाहन केले. तसे यापुढे पक्षशिस्तीला महत्त्व असेल. ज्यांना पक्षाच्या बैठकीला निमंत्रित केले, त्यांनीच केवळ हजर राहावे, असेही ते म्हणाले.
मनपात मनसेची सत्ता असताना कामे प्रचंड झालीच, मात्र भ्रष्टाचाराचा एक आरोपही मनसेवर झाला नाही, याचे स्मरण करून देत त्यांनी मनसेच्या काळात काय झाले आणि नंतर काय झाले, याची लोकांना जाणीव झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी माजी आमदार बाळा आमदार, अनिल शिदोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
इन्फो...
मनसेचा पक्षध्वज घराघरांवर लावा...
मनसेचे संघटन प्रचंड वाढवा, जागा तेथे शाखा असा उपक्रम राबवा. आपल्या भागात शाखा नाही, याची खंत वाटली पाहिजे. आपल्या परिसरात घरांवर मनसेचे ध्वज लावा, पक्षाचे झेंडे किती लागले, ते तुमचा विस्तार दर्शवतात, अशा अनेक टीप्स राज ठाकरे यांनी दिल्या. आपल्या भागात कोण राहतो, त्याचे नाव माहिती असली पाहिजे. आपुलकीने बाेलवता आले पाहिजे, इतकी माहिती ठेवा, असे सांगतानाच निवडणुकीपुरते उमेदवार खोटेखोटे गाेड बाेलून हात जोडतात, तसे करण्यापेक्षा आपुलकीने वागा, असेही सांगितले.
इन्फो...
घराबाहेर जोडे किती ते महत्त्वाचे...
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आचार्य अत्रे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेकांच्या आठवणी कथन करताना राज ठाकरे यांनी घराबाहेर जोडे किती, यावर तुमचा लोकसंग्रह किंवा संपत्ती किती हे कळते. त्यामुळे लोकांना जोडा, असे त्यांनी सांगितले. मुंबईच्या अंधेरी भागातील जुने नगरसेवक शांताराम आंबोरे यांची आठवण सांगताना ते झाडाखाली भेटून लाेकांना भेटत, त्यामुळे कुठे बसता, ते महत्त्वाचे नाही. लोकांना भेटणे महत्त्वाचे आहे, असे राज यांनी सांगितले.
---
२३ पीएचएसपी ६१