लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : राज्यात विविध भागात पावसाचे जोरदार आगमन झाले असून, जिल्ह्यातील पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातही गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार सुरू आहे. या पावसामुळे खरिपाच्या पेरणीला आणि लागवडीला वेग आला आहे. पावसामुळे तालुक्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने सर्वत्र हुलकावणी दिली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. इगतपुरी तालुक्यात सलग तीन दिवसांपासून संततधार सुरू असून, पिकाच्या लागवडीला आणि पेरणीला शेतकऱ्यांनी आरंभ केला आहे. जिल्ह्यात खरिपाच्या शेतकामांनी वेग घेतला आहे.मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने प्रत्येक धरणातील पाण्याच्या साठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. यात केवळ मृत साठा असलेल्या भावली धरणात १३७ दलघफू, तर दारणा धरणात ७० दलघफू पाण्याची वाढ झाली आहे. आज इगतपुरी तालुक्यात पश्चिम पट्ट्यातील भावली, मानवेढे, बोर्ली, पिंपरीसदो, नांदगाव सदो, कारावाडी, अवळखेड, कारावाडी, घोटी, तळोशी, टाके घोटी, बलायदुरी, त्रिंगलवाडी, बोरटेंभे, टिटोली, जामुंडे, गव्हांडे, पारदेवी, गिरणारे, तळेगाव, चिंचलेखैरे, खैरेवाडी तसेच कावनई, मुंढेगाव, मुकणे, साकूर, शेणीत, रायांबे, वाडीवऱ्हे, सांजेगाव, मुरंबी, टाकेद, खेड आदी भागात पावसाने दमदार बरसात केल्याने पश्चिम पट्ट्यात व पूर्व भागासह दिलासा मिळाला असून, भात शेतीला व भाताच्या रोपांना संजीवनी मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इगतपुरी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस
By admin | Updated: June 28, 2017 00:39 IST