लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने नांदगाववगळता जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला झोडपून काढले. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला असून, धरणसाठ्यातही कमालीची वाढ झाल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी दारणा व नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर सुरगाणा तालुक्यात पावसामुळे पाझर तलाव फुटला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीशी मिटली असून, गंगापूर धरणात सायंकाळपर्यंत ६२ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७५७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असली तरी, त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४४८ मिलीमीटर इतका पाऊस नोंदविला गेला आहे. विशेष करून नाशिक शहराला पहाटेपासून पावसाने झोडपून काढले. दुपारी बारा वाजेपर्यंत संततधार कोसळलेल्या पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी लागल्याने गोदाकाठी धार्मिक विधीसाठी आलेल्या बाहेरगावच्या नागरिकांची तारांबळ उडाली तसेच व्यावसायिकांनाही त्याचा फटका सहन करावा लागला. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली; दारणा नदीच्या पाण्यामुळे सिन्नर-घोटी मार्गावरील पूल कमकुवत झाल्याचे लक्षात येताच या तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसेच या मार्गावरील वाहतूक मुडीगावातून साकूड गोंद मार्गे वळविण्यात आली. एकीकडे अन्यत्र धुवाधार पर्जन्यवृष्टी होत असताना मालेगाव, नांदगाव, बागलाण, देवळा, येवला या तालुक्यांवर पावसाची वक्रदृष्टी कायम आहे.
जिल्ह्यात दिवसभर पाऊस
By admin | Updated: July 15, 2017 01:20 IST