नाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीचे शाहीस्नान आटोपल्यानंतर रविवार-सोमवार या दोन दिवसांत रेल्वेने दीड लाखाहून अधिक भाविक रवाना झाले. सोमवार दुपारनंतर रेल्वेस्थानकावरील परतीच्या भाविकांचा भार हलका झाला होता. श्रावण अमावस्येला दुसऱ्या पर्वणीनिमित्त लाखो भाविक रेल्वेद्वारे शहरात दाखल झाले होते. रविवारी सकाळी शाहीस्नान आटोपल्यानंतर हजारो भाविकांनी परतीच्या प्रवासासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानक गाठले होते. रविवारी दुपारनंतर परतीच्या भाविकांची मालधक्का परिसर व रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी झाल्याने रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात ठेवता-ठेवता नाकीनव आले होते. सायंकाळनंतर मालधक्का शेडमध्ये १५-२० हजारांहून अधिक भाविक रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. रविवारी रात्री लांब पल्ल्याच्या व कुंभमेळा स्पेशल रेल्वेने भाविक रवाना झाल्याने पहाटे तीन वाजेनंतर भाविकांचा थोडा भार हलका झाला होता. सोमवारी सकाळीदेखील पुन्हा भाविकांची परतीसाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र दुपारनंतर परतीच्या भाविकांची संख्या कमी झाल्याने रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिसांचे टेन्शन कमी होऊन रेल्वेस्थानकावरील भारदेखील हलका झाला होता. रविवार-सोमवार या दोन दिवसांत रेल्वेने दीड लाखाहून अधिक भाविक रवाना झाले होते. दुसऱ्या पर्वणीला आलेले साधू, भाविक पुन्हा परतीच्या प्रवासासाठी नाशिकहून नाशिकरोडला पायी निघाल्याने दिवसभर द्वारकापासून रेल्वेस्थानकापर्यंत भाविकांची गर्दी दिसत होती. परतीच्या भाविकांनी दर्शनासाठी मुक्तिधामलादेखील गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
रेल्वेने दीड लाख भाविक रवाना
By admin | Updated: September 14, 2015 23:45 IST