नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या रेल्वेची व्यवस्था मालधक्क्यावर करण्यात आल्याने माल वाहतूक पूर्णत: बंद होण्याचा फटका सार्वजनिक वितरण व्यवस्थेलाही बसला असून, गेल्या महिन्यात मनमाडहून पूर्ण धान्याची वाहतूक न झाल्याने रेशन दुकानांना धान्याचा पुरवठा होऊ शकला नाही तर चालू महिन्यातही अद्याप धान्य मिळू शकलेले नाही. नाशिक शहरातील रेशन दुकानांसाठी नाशिकरोड येथील शासकीय धान्य गुदामातून पुरवठा केला जातो व नाशिकरोड गुदामासाठी रेल्वेने मालधक्क्यावर रेशनसाठी धान्य आणण्यात येते. परंतु सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जवळपास दीड ते दोन महिने मालधक्का मालवाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे रेशनच्या धान्याची वाहतूक मनमाडच्या अन्नधान्य महामंडळातून करण्यात येते. प्रत्यक्षात गेल्या महिन्यात नाशिक शहरातील रेशन दुकानांंसाठी पुरेशा प्रमाणात अन्नधान्याची वाहतूक मनमाडच्या गुदामातून होऊ शकली नाही, परिणामी शहरातील ३९ रेशन दुकानांना धान्याचा पुरवठा करण्यात आला नाही. या दुकानदारांनी गेल्या महिन्यात चलनाद्वारे धान्याचे पैसेही अदा केले आहेत. गेल्या महिन्यातील घटनेचा बोध न घेता चालू महिन्यात २० तारीख उलटूनही शहरातील एकाही रेशन दुकानाला धान्य मिळालेले नाही. पुरवठा खात्याकडून धान्य मिळत नसताना दुसरीकडे शिधापत्रिकाधारकांनी मात्र दुकानदारांना धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे, त्यातून हमरी-तुमरी व वादाचे प्रसंगही घडू लागले आहेत. चालू आठवड्यात बकरी ईद, शनिवार, रविवार अशा लागोपाठ सुट्ट्या असल्यामुळे सोमवारपर्यंत धान्य मिळण्याची आशा रेशन दुकानदारांनी सोडून दिली आहे. त्यामुळे फक्त उरलेल्या तीन दिवसात कशा प्रकारे धान्याची उचल करायची व शिधापत्रिकाधारकांना त्याचे वाटप करायचे असा प्रश्न दुकानदारांसमोर उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)
महिना उलटूनही रेशनवर खडखडाट
By admin | Updated: September 23, 2015 23:39 IST