नाशिकरोड : मोबाइलवर बोलणाऱ्या महिलेच्या पर्समधून दोघा चोरट्यांनी ५४ हजारांचा ऐवज चोरून नेला. सिन्नर फाटा खर्जुलनगर येथील गजानन पार्क येथे राहणाऱ्या स्नेहल गोरडिया (३०) या आपल्या बहिणीसह मंगळवारी सायंकाळी दुचाकीवर (एमएच १५, डीटी १२४८) नाशिक-पुणे महामार्गे नाशिकरोडकडे येत होत्या. स्नेहल गोरडिया यांच्या बहिणीचा फोन आला असता त्यांनी नेहरूनगर येथे रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून मोबाइलवर बोलत होत्या. यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी स्नेहल गोरडिया यांच्या पर्समधील ४ हजार रुपये रोख व ५० हजारांचे दागिने व काही कागदपत्रे असा सुमारे ५४ हजारांचा ऐवज नजर चुकवून हातोहात चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पर्समधून ५४ हजारांचा ऐवज लांबविला
By admin | Updated: December 2, 2015 22:44 IST