नाशिक : महापालिका हद्दीतून जाणारी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी अर्थसाहाय्याचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या विविध योजनांतर्गत पाठवण्यात आला असून, त्याला मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्र शासनाकडून त्यास मान्यता मिळाल्यास महापालिका निवडणुकीच्या आतच या कामांचादेखील नारळ फोडण्याची तयारी सत्तारूढ भाजपने सुरू केली आहे.
दरबारा वर्षांनी गोदावरी नदीच्या काठावर कुंभमेळा भरतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गोदावरी नदीचे प्रदूषण हा नाशिकच नव्हे तर राज्यात गाजलेला विषय आहे. सहा राज्यांना जीवनदायिनी ठरलेल्या गोदावरी नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणप्रेमी प्रयत्न करीत असतानाच महापालिकेकडूनदेखील प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने मलवाहिका, नाले वळवणे असे विविध उपक्रम राबवले असून, आता गोदावरी नदीत प्रक्रियायुक्त मल सोडतानादेखील ते निरीसारख्या संस्थेच्या निकषानुसारच मध्येच बीओडी दहाच्या खाली असावा यासाठी सध्याच्या अस्तित्वातील मलशुद्धिकरण केंद्रांचे नूतनीकरण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर उपनद्यांसाठीदेखील शुद्धिकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नाशिक महापालिकेच्या माध्यमातून विविध नाले ट्रॅप करून नेटवर्क तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहे. २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यावर लक्ष घातले होते. त्यानंतर मलजल केंद्रांच्या नूतनीकरणासाठी निधी मागितला होता. त्यांच्यानंतर सध्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनीही प्राधान्यक्रमात गोदावरी शुद्धिकरण हा विषय ठेवला असून, महापौर सतीश कुलकर्णी यांनी तर नूतनीकरण तसेच नाले वळवणे आणि नद्या बारमाही वाहतील यासाठी नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा म्हणून शासनाकडे निधी मागितला आहे.
नाशिक शहरात सुमारे ६७ नाले असून, सध्या महापालिकेच्या वतीने त्यासंदर्भात सर्वेक्षण सुरू आहे. त्यानंतर नाले केवळ पावसाळ्यात वाहतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. म्हणजेच मलजल पूर्णत: बंद करून हे पाणी नदीपात्रात जाणार नाही ते थेट शुद्धिकरण केंद्रात जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आता सर्व कामांसाठी निधी मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. मध्यंतरी महापौर सतीश कुलकर्णी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिले होते.
कोट..
नाशिक महापालिकेच्या वतीने नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा अभियान राबवून नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, तो मंजूर व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. विशेषतः नाल्यातील पाणी नदीपात्रात जाऊ नये याची दक्षता घेतानाच नंदिनी आणि अन्य उपनद्यांना प्रदूषणमुक्त करण्याचा प्रस्ताव आहे.
- महापौर सतीश कुलकर्णी
इन्फो..
संपूर्ण गोदावरी नदी शुद्धिकरणासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखाव्या लागतील. मात्र, माझ्या कारकिर्दीत गोदावरी प्रदूषणमुक्त योजनेचे काही प्रमाणात काम होऊन या कामांना दिशा मिळावी यादृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.