लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्ग महापालिकेकडे अवर्गीकृत (डिनोटिफाइड) करण्यास शिवसेनेने आपली विरोधाची भूमिका कायम ठेवली असून, येत्या महासभेत त्याबाबत ठराव होण्यासाठी प्रस्ताव गटनेते विलास शिंदे यांनी ठेवला आहे. दरम्यान, महामार्गाबरोबरच रामकुंड व काळाराम मंदिर परिसरापासून एक कि.मी. अंतरापर्यंत दारूविक्रीस बंदी घालण्याची मागणीही शिवसेनेने प्रस्तावात केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील सर्व प्रकारच्या मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, शहरातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारू दुकाने वाचविण्यासाठी सदर महामार्ग हे महापालिकेकडे अवर्गीकृत करण्याच्या हालचाली मद्यविक्रेत्यांच्या लॉबीसह काही राजकीय पुढाऱ्यांनी प्रयत्न चालविले आहेत. या प्रयत्नांना शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते व गटनेता विलास शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन यापूर्वीच विरोध दर्शविला आहे. दरम्यान, येत्या महासभेत महामार्ग अवर्गीकृतबाबतचा प्रस्ताव येण्याच्या हालचाली लक्षात घेता शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी सदर महामार्ग अवर्गीकृत करण्यास विरोध दर्शविणारा प्रस्ताव तयार केला असून, तो महासभेत मांडला जाणार आहे. या प्रस्तावाचे ठरावात रूपांतर करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. सदर प्रस्तावात शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनी काही मोजक्या लोकांसाठी नाशिककरांना वेठीस धरणे अयोग्य असल्याचे स्पष्ट करत अपघातांची संख्या कमी करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील दारू दुकानांना परवानगी देऊ नये तसेच उत्तर प्रदेशातील काशी विश्वेश्वर मंदिर, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान, अलाहाबाद संगमच्या धर्तीवर शहरातील रामकुंड परिसर व काळाराम मंदिरापासून एक कि.मी. अंतरावरही दारू विक्रीस बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
महामार्ग अवर्गीकृतविरोधी शिवसेनेचा प्रस्ताव
By admin | Updated: May 9, 2017 02:43 IST