येवला : मुस्लीम बांधवांच्या पवित्र मोहरम ताजिया उत्सवानिमित्त शहरातून ढोल-ताशांच्या गजरात ताबुताची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्सवात अंतिम टप्प्यातील मिरवणुकीत शहरातील मुस्लीम बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.शहरातील तिकया भागातून मिरवणुकीला प्रारंभ झाला. बुरुड गल्ली, शिंपी गल्ली, पिंजार गल्ली, मुलतानपुरा या भागातून दुल्हा मैदानात या ताबुताची सांगता झाली. मिरवणुकीत युवकांनी लाठीकाठी,चक्र अशी विविध प्रात्याक्षिके दाखवली. यापूर्वी येवले शहरातून ३० पेक्षा अधिक ताबुतांची मिरवणूक काढण्यात येत होती. परंतु आता ताबुताची संख्या केवळ तीनवर येऊन ठेपली आहे. त्यामध्ये जरार पहिलवान, रमजान ई कुरेशी, मुसा कुरेशी यांच्यासह अनेक मुस्लीम बांधवांचा समावेश या मिरवणुकीत होता. लक्कडकोट भागातून व तिकया भागातून मुन्ना शेख व रमजान कुरेशी यांच्या मिरवणुकीनंतर घरी परतल्या. त्यानंतर गरजूंना दानधर्म आणि अन्नधान्य देण्याची मुस्लीम बांधवांमध्ये प्रथा आहे. त्यानुसार अनेक मुस्लीम बांधवांनी मिरवणुकीनंतर शेवटी गरजू लोकांना अन्नदान तसेच सरबताचे वाटप करण्यात आले. (वार्ताहर)
मोहरम ताजिया उत्सवानिमित्त येवल्यात ताबुताची मिरवणूक
By admin | Updated: October 13, 2016 00:57 IST