नााशिक : पदाची आब व सुरक्षिततेचा विचार करून शासन दरबारी निवेदन देण्यासाठी येणाऱ्या विविध शिष्टमंडळात पाच पेक्षा अधिक व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश निषिद्ध असताना सोमवारी निवेदन देण्यासाठी आलेल्या बांधकाम व्यावसायिकांना पायघड्या घालण्यात आल्या, पाचाच्या वीसपटीने दालनात थेट घुसलेल्या निवेदनकर्त्यांनी द्वारपालाला तर जुमानले नाहीच, परंतु शेकडोच्या संख्येने घुसखोरी करणाऱ्यांना दरडावावेसे जिल्हाधिकाऱ्यांनाही वाटले नाही. परिणामी दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या अभ्यागतांना तासन् तास वाट पाहण्याची शिक्षा मात्र भोगावी लागली. शासनाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात थेट घुसखोरी केल्याच्या अनेकवार घटना घडल्या आहेत. काहींनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडल्याचे, तर काहींनी दालनाबाहेर बसून जोरदार घोषणाबाजीही केल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात निवेदन देण्यासाठी दालनात घुसलेल्यांकडून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना चौफेर घेराव घालण्याचेही प्रकार घडले आहेत, त्यातून जिल्हाधिकाऱ्यांची गरिमा तर कमी झालीच, परंतु त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला. मात्र कुशवाह यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अभ्यागतांसाठी नियमावली तयारी केलीच, परंतु निवेदन देण्यासाठी फक्त पाच व्यक्तींनाच दालनात प्रवेश देण्याची सक्तीची अट लादली. या नव्या नियमांच्या अंमलबजावणीने जिल्हाधिकाऱ्यांचे सुरक्षा रक्षक व द्वारपालांची डोकेदुखी कमी झाली, सोमवारी मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे सारे नियम पायदळी तुडविले गेले. निवेदन देण्यासाठी आलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी शेकडोच्या संख्येने घुसखोरी करताना दंडावर बांधलेल्या काळ्या फितीचे प्रदर्शन केले. त्यांना हटकण्याचे धाडस जिल्हाधिकाऱ्यांनीही दाखविले नाही. (प्रतिनिधी)
व्यावसायिकांना पायघड्या; अभ्यागतांना शिक्षा
By admin | Updated: October 13, 2015 00:10 IST