नाशिक : सुरगाणा येथील बहुचर्चित शासकीय धान्य घोटाळ्यात गुंतलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी व वाहतूक ठेकेदारांकडून अपहार रकमेच्या सुमारे पाच कोटी रुपयांच्या वसुलीसाठी आता त्यांच्या मालमत्तेवरच टाच आणण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, पुरवठा खात्याने जिल्ह्णातील सर्वच तहसीलदारांना पत्र पाठवून आरोपींच्या संपत्तीची माहिती मागविली आहे. दीड महिन्यांपूर्वी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या संदर्भात सुरगाणा पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांनी सुरगाणा तहसीलदारांसह सात जणांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला. साधारणत: सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सुरगाणा शासकीय धान्य गुदामातील सुमारे ३६ लाख टन धान्याचा अपहार करून ते काळ्या बाजारात विक्री केल्याने शासनाचे सव्वापाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. नोव्हेंबरमध्ये मुंबईच्या दक्षता पथकाने जिल्ह्णातील सर्वच शासकीय गुदामांची तपासणी केली असता, सुरगाणा गुदामात अन्नधान्य महामंडळाकडून प्राप्त झालेले धान्य, प्रत्यक्ष उपलब्ध धान्य व वाटप केलेल्या धान्याचा ताळमेळ बसत नसल्याचे तसेच गुदामाचे दप्तर अद्यावत नसल्याचे आढळून आल्यावर पुरवठा खात्याने अंतर्गत लेखा परीक्षकांकडून धान्य गुदामाची तपासणी केल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याबरोबरच सुरगाणा तहसीलदार तडवी, गुदामपाल भोये अशा चौघांना जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निलंबित केले, तर वाहतूक ठेकेदाराचा पोलीस शोध घेत आहेत. या संदर्भातील तपासाचे सारे सूत्रे पोलिसांच्या हाती असले तरी, या घोटाळ्यात शासनाचे झालेल्या नुकसानीची वसुली करण्याचे धोरण असल्याने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घोटाळ्यातील सर्वच आरोपींच्या नावानिशी असलेल्या मालमत्तेचा शोध घेण्याबाबतचे पत्र जिल्ह्णातील सर्व तहसीलदारांना पाठविले.
वसुलीची कार्यवाही : संपत्तीवर चढवणार बोझा
By admin | Updated: March 6, 2015 23:47 IST