नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून चिमणबागेत कामासाठी नेलेल्या कैद्याने चपलेच्या तळामध्ये लपवून आणलेल्या गांजाच्या दहा पुड्या आढळून आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंदी क्रमांक ६६ असीस डॉमेनिक वरवले याला गेल्या सोमवारी कारागृहाच्या अखत्यारितील चिमणबागमध्ये शेतीकामासाठी नेण्यात आले होते. शेतीकाम आटोपल्यानंतर कैदी असीस वरवले यास पुन्हा कारागृहात आणले असता प्रवेशद्वारावर त्याची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या पायातील काळ्या-निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या चपलेच्या तळाशी त्याने १३० रुपये किमतीच्या गांजाच्या दहा पुड्या रबर लावून अडकवून घेऊन जात असताना आढळून आला. याप्रकरणी शुक्रवारी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तुरुंग अधिकारी अभिजित सुदाम कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या सोमवारी कैद्याकडे गांजा मिळाल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी कारागृह प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
कारागृहात कैद्याकडे सापडला गांजा
By admin | Updated: February 25, 2017 23:47 IST