नाशिक : कांद्याचे दिवसागणिक घसरत चाललेल्या दराची थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून, यासंदर्भात कांदा दर व कांदा निर्यातमूल्यासह सर्व प्रकारची माहिती तत्काळ दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून काल (दि. २२) सायंकाळी पंतप्रधान कार्यालयाने मागविली.काल कांदा दराच्या सातत्याने घसरणीच्या पार्श्वभूमीवर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत नाशिकसह महाराष्ट्रातील एकूणच कांद्याची वाढलेली आवक व त्याअनुषंगाने घसरलेले दर आणि या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीतील बंद व रास्ता रोको आंदोलनांची माहिती देत कांद्याचे निर्यातमूल्य चारशे डॉलरवरून शून्य करावे, ही मागणी मंगळवारी सायंकाळी उशिरा होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची विनंती केली.त्यावेळी नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तत्काळ भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. पंतप्रधानांना नाशिक व महाराष्ट्रातील कांद्याच्या घसरत चाललेल्या दराबाबत व त्याअनुषंगाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पसरत असलेल्या नाराजीबाबत कल्पना दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरा होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येईल. तसेच वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडूनही कांद्याचे निर्यातमूल्य कमी करण्याबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिल्याचे समजते. नितीन गडकरी व हरिश्चंद्र चव्हाण यांच्या भेटीनंतरच लगेचच तासाभरात पंतप्रधान कार्यालयाकडून खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना कांद्याबाबतचा सविस्तर तपशील व माहिती देण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यामुळे कांद्याच्या निर्यातमूल्य कमी करण्याबाबत लवकरच ठोस निर्णय होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
कांदा दर घसरणीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
By admin | Updated: December 22, 2015 22:58 IST