नाशिक : क्रीडा संस्कृती, क्रीडा साधना आणि डी.एस. फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित २२ व्या कारगिल विजय दिनाच्या सोहळ्यात कारगिल युद्धात लढलेले वीर जवान, वीरमाता आणि वीरपत्नी यांना गौरविण्यात आले.
कालिका माता मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामध्ये कारगिलच्या युद्धात लढताना वीरमरण आलेले नाशिकचे जवान एकनाथ खैरनार यांच्या पत्नी रेखा खैरनार, कारगिल युद्धात गोळ्या अंगावर झेललेले सुभेदार माणिक निकम, सुभेदार फ्लाइंग ऑफिसर प्रभाष नारायण उपाध्याय, कॅप्टन ए.पी. राठोड, प्रकाश कारभारी लांडगे, प्रकाश हवालदार, प्रकाश मेघणे, सुभेदार मेजर दिनकर पवार, वीरमाता किसनाबाई श्रीकृष्ण बच्छाव, वीरमाता बाळूबाई श्यामराव सोनवणे, वीरपत्नी अर्चना काशीनाथ निकम आणि इतर जवान आणि वीरपत्नी उपस्थित होते.
१९९९ ला पाकिस्तानने घुसखोरी करून द्रास क्षेत्रात अतिक्रमण केले होते. भारताच्या सैनिकांनी प्राणांची बाजी लावून २६ जुलै, १९९९ ला पूर्ण विजय मिळविला. तेव्हापासून २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्व वीरांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजय साने, नगरसेवक योगेश हिरे, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते रमेश येवले यांच्या हस्ते शाल श्रीफळ, छत्री आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नेते विजय साने यांनी आपल्यासाठी सैनिक प्राणांची बाजी लावून देशाचे रक्षण करत असल्याचे सांगितले. त्यांचे हे योगदान फार मोलाचे असल्याची जाणीव सर्वांनी ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय खरे यांनी केले. सत्कारार्थीच्या कार्याची माहिती अस्मिता दुधारे यांनी सांगितली. आभार सुदाम सूर्यवंशी यांनी मानले.
इन्फो
भारत विजयाचे लक्ष्य
या वेळी फ्लाइंग ऑफिसर प्रभाष उपाध्याय आणि सुभेदार माणिक निकम यांनी कारगिल युद्धाच्या प्रसंगाचे अनुभव सांगितले. उपाध्याय यांनी सांगितले की, आम्ही अगदी कठीण परिस्थितीत पाक घुसखोरांचा सामना केला. या भागात उणे ४० ते उणे ४५ डिग्री तापमान असते आणि पाकिस्तानी सैनिक उंचावर होते. अशा अवघड वातावरणात आम्हाला लढावे लागले. हे युद्ध लढत असताना माझ्या डोळ्यासमोर सहकाऱ्यांनी प्राण गमावले. तरीही आमच्या समोर फक्त भारत आणि भारताचा विजय हेच एकमेव ध्येय होते आणि आम्ही ते सर केले याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. सुभेदार माणिक निकम यांनी सांगितले की या वेळी मला दोन गोळ्या लागल्या. मला प्रत्यक्ष कारगिल युद्धात सहभागी होऊन आपल्या भारत देशासाठी काहीतरी करता आले याच्यासारखा मोठा आनंद कोणताच नसल्याचे त्यांनी नमूद केले.
फोटो : (२६कारगील कालिका)
कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी कारगिल युद्धातील भारताचे सैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि मान्यवर.