खामखेडा : कांद्याचे भाव सतत कोसळत असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने पोळ कांद्याची लागवड केली. परंतु पोळ कांद्याचे भाव प्रचंड प्रमाणात कोसळले होते. आता रांगडा कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.चालूवर्षी अल्पशा पावसामुळे शेतकऱ्याने पोळ कांद्याची लागवड उशिरा केली. पोळ कांद्याची लागवड उशिरा झाल्यामुळे मार्केटमध्ये उशिरा दाखल झाला. पोळ कांद्याच्या हंगामात भाव प्रचंड प्रमाणात कोसळले होते तेव्हा शेतकऱ्यांनी मार्केट बंद करून रास्ता रोको व आंदोलन केले. त्यामुळे पोळ कांद्याच्या भावात थोड्याफार प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे शेतकऱ्याला थोडाफार दिलासा मिळाला होता. पोळ कांद्याची उशिरा लागवड झाल्याने उत्पादनात घट झाली व भाव न मिळाल्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. निर्यातमूल्य शून्य असल्याने पुढे कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्याने पुन्हा मोठ्या हिमतीने रांगडा कांद्यासाठी भांडवल उपलब्ध करून लागवड केली होती. मात्र आताही भावात सुधारणा न झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. चालूवर्षी पावसाळा भरपूर असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रांगडा कांद्याची लागवड केली होती. आणि या वर्षी कांद्याला पोषक वातावरण असल्याने रांगडा कांद्याचे उत्पादन चांगल्यापैकी आल्याने चांगला भाव मिळून हाती चार पैसे जास्त मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु बाजारात कांद्याचे भावात प्रचंड प्रमाणात कोसळल्याने उत्पादनातून मिळणाऱ्या पैशावर खर्चही मिळणार नाही. तेव्हा कांद्यासाठी आणलेले भांडवल कसे परत करावे हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.रांगडा कांद्याला पोषक वातावरण असल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात आले. आता कांदा काढणीचा हंगाम सुरू असल्याने कांद्याची आवक वाढल्याने व इतर राज्यांत कांद्याचे उत्पादन चांगल्या प्रमाणात आल्याने भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. रांगडा कांदा जरी उन्हाळी कांद्याप्रमाणे एकदम तयार होत असला तरी तो उन्हाळी कांद्याप्रमाणे चाळीत साठवणूक करता येते नाही. आणि जास्त दिवसही ठेवता येत नाही. जर जास्त दिवस ठेवला तर खराब होतो. त्यामुळे रांगडा कांदा मिळेल त्या भावामघ्ये शेतकऱ्याला विकावा लागतो. (वार्ताहर)
रांगडा कांद्याचे भाव कोसळले
By admin | Updated: February 22, 2017 23:27 IST