नाशिक : महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने सिंहस्थ कामे रखडल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला खरा; परंतु याच महापालिकेने केवळ कुंभमेळ्यात दिशादर्शक फलक लावण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. नाशिकमध्ये इतक्याप्रमाणात फलक लावण्यामागे पालिकेची काटकसर आहे की उधळपट्टी असा प्रश्न मात्र आता निर्माण झाला आहे.जकात रद्द झाल्यापासून महापाालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. एलबीटी पुरेसा वसूल होत नसतानाच महापालिकेवर कुंभमेळ्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महापालिकेने कुंभमेळ्यासाठी आधी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांना आराखडा तयार केला होता. राज्य शासनाने त्यात कपात करून एक हजार ५२ कोटी रुपयांचा केला आहे; परंतु एक हजार कोटी रुपयांची कामे करणे शक्य नसल्याने राज्यशासनाकडे ९० टक्के निधी देण्याची मागणी केली होती; परंतु शासन तयार नव्हते. बऱ्याच परिश्रमानंतर राज्यशासनाने ६६ टक्के निधी देण्याची तयारी केली म्हणजे ३३ टक्के निधी महापालिकेने खर्च करायचा आहे; परंतु त्यासाठीही पुरेसा निधी नाही. त्यामुळे कर्ज काढण्याची तयारी केली असून, सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यात येणार आहे. महापालिकेकडे निधी नाही म्हणून २ एप्रिल रोजी सत्तारूढ मनसेचे नेता राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये शासनावर खापर फोडले. एकीकडे अशाप्रकारे आर्थिक परिस्थितीचे रडगाणे गायले जात असताना दुसरीकडे,मात्र कुंभमेळ्याच्या निमित्ताने संपूर्ण शहरात फलक लावण्यासाठी १४ कोटी रुपयांच्या निविदा मागविल्या आहेत. या निविदा अधिक दराच्या आल्यास हे काम चौदा कोटी रुपयांच्या आतच होईल हे सांगता येत नाही. अशा स्थितीत पालिकेला हे परवडणारे आहे काय?
कुंभमेळ्यात दिशादर्शक फलक लावण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी
By admin | Updated: April 5, 2015 00:47 IST