नाशिक : नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. हाच कौल पंधराव्या फेरीपर्यंत कायम राहिल्याने निवडणूक अधिकार्यांनी निकालाचा अंदाज ओळखत दिंडोरीचे भाजपाचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा निकालाचा दाखला (इलेक्शन सर्टिफिकेट) तयार करण्यात आला होता. याच प्रमाणपत्रांवर अंतिम निकालानंतर निवडणूक अधिकार्यांनी स्वाक्षरी केली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून हे दोन्ही उमेदवार आघाडीवर होते. त्यांची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. विशेष म्हणजे, या दोन्ही उमेदवारांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना एकाही फेरीत पुढे जाता आलेे नाही. जसजशा मतदानाच्या फेर्या पुढे सरकत होत होत्या तसतसे निकालाचे चित्र स्पष्ट होत होते. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून हरिश्चंद्र चव्हाण यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाल्याचे स्पष्ट झाले होते. हा कौल लक्षात घेता येथील कर्मचार्यांनी अगोदरच या दोहोंचेही प्रमाणपत्र तयार करून ठेवले होते. निकालाची केवळ औपचारिकता राहिल्याने अधिकार्यांनीदेखील असे प्रमाणपत्र बनविण्यास हरकत नसल्याचे सुचविल्याने निकालाआधीच प्रमाणपत्र तयारही झाले होते. त्यामुळे कामाचा वेळ वाचला असला, तरी त्यामुळे निकालही स्पष्ट होऊन गेला. विशेष म्हणजे, निकालाचा कल पाहता अधिकार्यांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र होते. भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतल्यामुळे अधिकार्यांनी भ्रमणध्वनीचा मनसोक्त वापर करीत निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपल्या हितचिंतकांना लघुसंदेश पाठविले. एकूणच मतमोजणी केंद्रावर विजयी उमेदवारांचे समर्थक आणि अधिकार्यांमध्ये चैतन्य दिसून आले. (प्रतिनिधी)
निकालाआधीच उमेदवारांचे प्रमाणपत्र तयार
By admin | Updated: May 17, 2014 00:21 IST