सटाणा : बागलाण तालुक्याच्या आदिवासी दुर्गम पश्चिम पट्ट्यातील शेवरे गावालगतच्या गडाच्या पायथ्याशी एका झोपडीत प्रेमीयुगुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर उमाजी पवार (२२ रा.भिलवाड ता. बागलाण व प्रमिला रामू गवळी (१८ रा. शेवरे, ता. बागलाण) हे दोन्ही युवक युवती ६ फेब्रुवारी २०१९ पासून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी नातेवाइकांसह इतरत्र शोध घेऊनही ते न मिळून आल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी जायखेडा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दिलेली होती. जायखेडा पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असतानाच गुरुवारी (दि ११) दुपारी बागलाण तालुक्यातील शेवरे शिवारात असलेल्या गडाच्या पायथ्याशी एका झोपडीत एका युवकाचा व युवतीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती भिलवाडचे पोलीस पाटील रवींद्र कुवर यांनी जायखेडा पोलिसांना दिली. सहायक उपनिरीक्षक कृष्णा पारधी व पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली असता युवक-युवतीचा मृतदेह ज्ञानेश्वर पवार व प्रमिला गवळी यांचा असल्याचे निष्पन्न झाले. जायखेडा पोलिसांनी घटनास्थळीच पंचनामा करून दोघांचे मृतदेह नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असता विषारी औषध सेवन करून दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. जायखेडा पोलिसांनी दोन्ही दोघांच्याही कुटुंबांना या घटनेची माहिती देत सायंकाळी उशिरा दोघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. जायखेडा पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे करीत आहेत.
बागलाणमध्ये प्रेमीयुगुलाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:52 IST