नाशिक : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर या रजेवर गेल्यानंतर त्यांच्या पदाची सूत्रे नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे सोपविण्याचे आदेश शासनाने काढल्याचे वृत्त आहे.दरम्यान, आपल्याकडे आदिवासी विकास आयुक्त पदाचा प्रभारी पदभार सोपविल्याबाबतच्या सूचना शासन स्तरावरून आल्या होत्या; मात्र आपण बाहेरगावी असल्याने अद्याप पदभार स्वीकारलेला नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.आदिवासी विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना वादाच्या भोेवऱ्यात सापडल्याचे आरोप आणि विद्यार्थ्यांंची सततची या ना त्या कारणांनी होणारी आंदोलने या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभाग चर्चेत होता. त्यातच आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिवाळी संपूनही अद्याप शालेय गणवेश, साहित्य तसेच शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याचा आरोप माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी नुकताच केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वीच आदिवासी विकास विभाग आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर या वैयक्तिक कारणास्तव रजेवर गेल्याने त्यांच्या पदाची प्रभारी सूत्रे समकक्ष दर्जाचे अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे सोपविण्याबाबत शासन आदेश निघाल्याचे समजते. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अशा प्रकारचे आदेश निघाल्याबाबतच्या वृत्तास दुजोरा दिला; मात्र आपण बाहेरगावी असल्याने प्रभारी पदाची सूत्रे स्वीकारली नसल्याबाबतही स्पष्ट केले. आता आदिवासी विकास विभाग आयुक्त पदावर कायमस्वरूपी कोणाची वर्णी लागते, याबाबत आदिवासी विकाम विभागाच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
आदिवासी विकास प्रभारी आयुक्तपदी प्रवीण गेडाम
By admin | Updated: November 19, 2015 00:04 IST