लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा कॉलेज टीचर्स को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी समर्थ पॅनल विजयी झाले असून, परिवर्तन पॅनलच्या केवळ चार उमेदवारांना मतदारांनी कौल दिला. प्रा. नानासाहेब दाते यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविताना समर्थ पॅनलने १७ पैकी १३ जागांवर विजय मिळवला, तर परिवर्तनच्या एस. के. शिंदे यांच्यासह रवींद्र गोडसे, अण्णा टर्ले, विक्रम काळकुते यांना मतदारांनी निवडून दिले.समर्थ पॅनलचे नेते प्रा. दाते यांच्यासह अनिल भंडारे, सुनीता कचरे, वैशाली कोकाटे, सोपान एरंडे, एस. एम. शिरसाठ, संपत काळे, शिवाजी वाघ, अशोक बाजारे, संपत कदम, राजेंद्र धनवटे, सीताराम निकम, कल्पना अहिरे विजयी झाले. सुमारे सतराशे मतदार असलेल्या सोसायटीच्या निवडणुकीत १५८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी निवडणूक रिंगणातील ३५ उमेदवारांतून १७ उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान करताना समर्थ पॅनलचे १३, तर परिवर्तन पॅनलचे चार उमेदवार निवडून दिले. या विजयाविषयी प्रतिक्रिया देताना गेल्या पंचवीस वर्षांतील पारदर्शक कारभारामुळेच सोसायटीच्या सभासदांनी समर्थ पॅनलवर पुन्हा एकदा विश्वास दाखविला असल्याचे मत प्रा. दाते यांनी व्यक्त के ले, तर निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते देत मतदारांनी परिवर्तन पॅनलवर विश्वासच दाखविला असून, मतदारांचा कौल आम्हाला मान्य आहे. पुढील काळात सभासदांच्या हक्कासाठी व सोसायटीचा कारभार सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया प्रा. एस. के. शिंदे यांनी व्यक्त केली.
टीचर्स सोसायटीत समर्थ पॅनलची सत्ता
By admin | Updated: May 9, 2017 02:40 IST