नाशिक : उपनगर येथील टपाल भांडारगृहाच्या आवारात सुरू असलेल्या राज्यस्तरीय ‘महापेक्स-२०१६’ या टपाल तिकीट प्रदर्शनाच्या निमित्ताने रविवारी (दि.१७) शहरातील अत्यंत प्राचीन ऐतिहासिक काळाराम मंदिर आणि नाशिकची द्राक्षे टपालाच्या विशेष पाकिटावर झळकले. ऐतिहासिक ‘पांडवलेणी’व काळाराम मंदिर या दोन्ही सुप्रसिद्ध वास्तूंना टपालाच्या पाकिटावर स्थान मिळाले असून, नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. बारावे राज्यस्तरीय ‘महापेक्स’ टपाल तिकिटांचे राज्यस्तरीय प्रदर्शन सतरा वर्षांनंतर शहरात पुन्हा भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनामुळे शहरातील विविध शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व इतिहासाची टपाल तिकिटांच्या माध्यमातून माहिती मिळण्यास मदत होत आहे. तसेच टपालाचा इतिहासदेखील भावी पिढी या ठिकाणी जाणून घेत आहे. कुतुहलापोटी विद्यार्थी तिकीट व विशेष पाकिटे संग्रहासाठी खरेदी करतानाही दिसून आले. आज रविवार असल्याने प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी लोटली होती. आज पहिल्या सत्रात पंचवटीमधील काळाराम मंदिराचे छायाचित्र असलेले विशेष पाकिटाचे न्यायाधीश तथा मंदिराचे विश्वस्त एन. बी. बोस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकचे द्राक्षे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रसिद्ध असल्यामुळे टपाल विभागाने या प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘ग्रेप सिटी, नाशिक’ असा उल्लेख व द्राक्षांचा घडाचे छायाचित्र असलेले विशेष पाकिटाचे अनावरण केले. यावेळी महाराष्ट्र सर्कलचे जनरल पोस्टमास्तर अशोक कुमार दास, व्ही. के. शर्मा, सईद रशीद, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंके आदि मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
टपाल पाकिटावर काळाराम मंदिर अन् द्राक्षे
By admin | Updated: January 18, 2016 23:06 IST