लासलगाव : आत्महत्या केलेल्या महिलेच्या फिर्यादीची दखल न घेता आत्महत्येस प्रवृत्त करत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी इंदिरानगरचे पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकावर सायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या चुलत्याने फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चांदोरी शिवारात एका महिलेने आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली होती. तिच्याजवळ सापडलेल्या पर्स व कागदपत्रांवरून तिची ओळख पटली होती. यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. मृत महिलेवर बाळू गिरीधर जाधव याने गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार करत चित्रीकरण केले होते. तसेच ते चित्रीकरण तिच्या पतीस भ्रमणध्वनीवर पाठविले. यामुळे तिच्या पतीने तिचा त्याग केला होता. यानंतर पीडितेने तिचेवर झालेल्या अत्याचाराची तक्रार इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, त्याची दखल वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी घेतली नाही. याउलट दहा-पंधरा दिवस तिला पोलीस ठाण्यात चकरा माराव्या लागल्या होत्या. त्यामुळे पीडितेने वरिष्ठांपर्यंत ही माहिती पाठवत उच्च न्यायालयात दाद मागितली होती.परिणामी नैराश्य आल्याने पीडितेने चांदोरी शिवारातील गोदावरी नदीपात्रात आत्महत्या केली होती. यामुळे मयत महिलेच्या चुलत्याने सायखेडा पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, इंदिरानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, सहायक निरीक्षक जगताप यांच्यासह मृत महिलेचा पतीे, बाळू व दिलीप गिरिधर जाधव यांच्याविरुद्ध कलम ३०६, ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अशिष अडसूळ तपास करीत आहेत. पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी उच्च न्यायालयात केलेल्या अर्जाच्या आधारे पीडितेची फिर्याद दाखल करून घेत बाळू गिरीधर जाधव याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला. तर तपास सहायक निरीक्षक जगताप यांच्याकडे होता. परंतु तपासावेळी पीडितेला तुझ्याकडे साक्षीदार नाही, ठोस पुरावा नाही असे सांगत तिचे मनोबल कमी करणे तसेच दिलीप जाधव याने पीडितेने दाखल केलेली बलात्काराची फिर्याद मागे घेण्याबाबत फोन करु न धमकावले होते.
महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:51 IST
आत्महत्या केलेल्या महिलेच्या फिर्यादीची दखल न घेता आत्महत्येस प्रवृत्त करत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी इंदिरानगरचे पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकावर सायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या चुलत्याने फिर्याद दाखल केली आहे.
महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा
ठळक मुद्देअत्याचाराची दखल न घेतल्याने फिर्यादीने संपविले जीवन