मालेगावकरांना सुखद धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 02:01 AM2020-04-28T02:01:17+5:302020-04-28T02:01:46+5:30

कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरातून रोज धक्कादायक बातम्या येत असतानाच सोमवारी (दि. २७) तब्बल ४३९ रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मालेगावकरांना सुखद धक्का बसला. सोमवारी दुपारपर्यंत एकाच रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२७वर जाऊन पोहोचली असून, कोरोनाने आतापर्यंत बारा जणांचा बळी घेतला आहे.

Pleasant shock to Malegaon residents | मालेगावकरांना सुखद धक्का

चार दिवसांच्या बंदनंतर मालेगाव येथील सोयगाव बाजार ग्राहकांच्या गर्दीने पुन्हा गजबजला. मात्र फिजिकल डिस्टन्सिंगला हरताळ फासण्यात आला.

Next
ठळक मुद्देशुभवर्तमान : एकाच दिवशी ४३९ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

मालेगाव : कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरातून रोज धक्कादायक बातम्या येत असतानाच सोमवारी (दि. २७) तब्बल ४३९ रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मालेगावकरांना सुखद धक्का बसला. सोमवारी दुपारपर्यंत एकाच रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२७वर जाऊन पोहोचली असून, कोरोनाने आतापर्यंत बारा जणांचा बळी घेतला आहे.
शहरात रोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहर दहशतीखाली असताना रविवारी (दि. २६) चांदवडचा एक आणि मालेगावचे दोन असे तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने शहरवासीयांना हायसे वाटले, तर सोमवारी मालेगावच्या ४३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सुखद धक्का मिळाला. तब्बल ४३९ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणेला मोठा दिलासा लाभला आहे. दरम्यान, एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याबाबत वैद्यकीय अधिकारी चौधरी यांनी सांगितले, पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा जुनाच असून, त्याचा अहवाल पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. शहरात गेल्या दहा-बारा दिवसात सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कुणी उपचारासाठी पुढे येत नव्हते मात्र रविवारी तीन जणांनी कोरोनावर विजय मिळविल्याने काहीअंशी दहशत कमी झाली आहे. त्यामुळे लोक तपासणीसाठी पुढे येतील, अशी अपेक्षा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, आणखी १३ रुग्ण कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर असून, शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘त्या’ सहा महिला पुन्हा रुग्णालयात
मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयातून निघून गेलेल्या ‘त्या’ सहा महिलांना पुन्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरातील सहा महिलांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. आम्हाला दुसऱ्या रुग्णालयात ठेवा असे सदर महिलांचे म्हणणे होते. त्या महिला बुरखे परिधान करून सामान्य रुग्णालयातून नजर चुकवून निघून गेल्या होत्या. रविवारी (दि. २६) तीन जण कोरोनामुक्त झाल्याने येथील अधिकारी कर्मचारी मन्सुरा हॉस्पिटलमध्ये त्यांना निरोप देण्यासाठी गेले होते. ही संधी साधून डॉक्टरासाठी असलेल्या प्रवेशद्वारातून त्या महिला निघून गेल्या होत्या.
सोयगाव मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी
मालेगाव कॅम्प : चार दिवसांच्या बंदनंतर मालेगावचा घाऊक किराणा सोयगाव बाजार सोमवारी (दि.२७) पुन्हा सुरू झाला. त्यामुळे सकाळपासून ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. कसमादे भागात प्रसिद्ध असलेला सोयगाव बाजार सोमवारी चार दिवसांच्या बंदनंतर सुरू झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसह विक्रेत्यांनी यावेळी मास्क घालत काळजी घेतली; परंतु काही दुकानांवर फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडविला जात होता. मार्केटमध्ये जवळपासच्या गाव खेड्यातील काही ग्राहक आपल्या वाहनांसह दाखल झाले होते. यामुळे ग्राहक व वाहनांच्या गर्दीने सोयगाव बाजारपेठ गजबजली होती.

Web Title: Pleasant shock to Malegaon residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.