पिंपळगाव बसवंत : येथील रानमळा भागातील गट नंबर ३८३ मध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरामध्ये घबराट निर्माण झाली आहे.येथील रानमळा भागात विलास मोरे यांचे उसाचे क्षेत्र असून, शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता या उसात पुन्हा बिबट्या शिरल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले. रानमळा भागात बिबट्या असल्याने शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. याच ठिकाणी राहणारे अरुण मोरे यांच्या मोटारसायकललाही बिबट्या आडवा गेला होता. सदर बिबट्या मादीअसून, सोबत दोन बछडेपण असल्याचे मोरे यांनी सांगितले.बारा दिवसांनंतर पुन्हा याच ठिकाणी बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात पुन्हा घबराट पसरली आहे. सध्या द्राक्षतोडणी हंगाम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी कामासाठी सुरगाणा, पेठ तालुक्यातील मजूर तात्पुरत्या झोपड्या उभारून राहात आहेत. बिबट्याच्या दर्शनामुळे त्यांना रात्र जागून काढावी लागत आहे.
पिंपळगाव बसवंतला पुन्हा बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 01:25 IST