पांगरी/नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे मालट्रक, तर दोडी शिवारात कंटेनरने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चारचाकी वाहने घेऊन जात असलेल्या धावत्या कंटेनरच्या इंजिनला अचानक आग लागल्याने सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी सकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दोडी शिवारातल्या उड्डाण पुलाजवळ ही घटना घडली.कंटेनरचालक मोहम्मद फरिद अन्सारी (२३), मूळ राहणार झारखंड (हल्ली मुक्काम सातपूर, नाशिक) हा कंटेनरमध्ये (एचआर ५५, एल ४३३०) चाकण, पुणे येथून महिंद्रा कंपनीच्या नऊ कार नाशिक येथील विक्रेत्याकडे पोहचविण्यासाठी निघाला होता. दोडी उड्डाण पुलाजवळ आल्यानंतर कंटेनरच्या इंजिनला आग लागल्याचे अन्सारी याच्या लक्षात आले. त्याने तातडीने कंटेनर थांबवून उडी मारल्याने तो बचावला. परिसरातील नागरिकांनी सदर घटनेची माहिती सिन्नर येथील अग्निशमन दलास दिली. अग्निशमन दलाचा बंब तत्काळ घटनास्थळी पोहचल्याने आग आटोक्यात आली. मात्र कंटेनरच्या कॅबिनसह वाहनांची कागदपत्रे, चलन, लायसन्स, टायर, पत्रा जळून खाक झाला होता. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मित जळीताची नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक एम. जे. सैयद अधिक तपास करीत आहे.(वार्ताहर)
पांगरीत ट्रक तर दोडीत कंटेनर पेटला
By admin | Updated: January 3, 2016 00:35 IST