पंचवटी : एरव्ही काहीही अप्रिय घटना घडली की, दिंडोरीरोडवर पडसाद उमटण्याची नागरिकांना धास्ती बसते, परंतु यंदा तळेगाव प्रकरणानंतर फुलेनगर परिसरात नागरिक शांत आणि संयमाने राहिल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. स्थानिक स्तरावरील नागरिकांनी प्रयत्न केलेच परंतु जातीपेक्षा महत्त्वाची माणुसकीची नाती या परिसर पंचायतीच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात आली. फुलेनगर परिसरात प्रामाणिक, कष्टकरी बांधव राहत असून, कोणताही अनुचित प्रकार घडू देऊ नये. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका तसेच एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासून समाजात चांगला संदेश पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी शुक्रवारी या पंचायतीच्या निमित्ताने केले. लोकनिर्णय सामाजिक संस्था, पंचवटी पोलीस ठाणे व नाशिक, कोरो महिला मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फुलेनगरला ‘जातीपेक्षा महत्त्वाची माणुसकीची नाती’ या अनुषंगाने परिसर पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी बर्डेकर बोलत होते. पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत. यावेळी संतोष जाधव, निवृत्ती त्रिभुवन, भास्कर लोणारे, विनायक गायकवाड, संजय भुरकूड, मुन्ना भोंड, शंकर खोडे, सविता कुमावत, सागर निकम, मुन्ना पवार आदिंसह नागरिक उपस्थित होते.
फुलेनगर राहिले शांत
By admin | Updated: October 15, 2016 02:03 IST