नाशिक : मतदार याद्यांमध्ये गोंधळाची स्थिती असतानाही यंदा महापालिका निवडणुकीसाठी ६१ टक्के मतदान झाले. सुमारे ७० हजारांहून अधिक नवमतदारांची झालेली नोंदणी, मतदार जागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाच्या टक्केवारीत चार टक्क्यांनी वाढ झाली. मतदारांमध्ये मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. कुठेही हिंसक वा अनुचित प्रकाराची घटना न घडता शांततेत मतदानप्रक्रिया पार पडल्याने महापालिकेसह पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. महापालिका निवडणुकीत २२ राजकीय पक्षांचे ८२१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यंदा प्रथमच बहुसदस्यीय प्रभाग पद्धती राबविताना एका प्रभागातून चार सदस्य निवडून द्यायचे होते. त्यामुळे या निवडणुकीबाबत मतदारांमध्ये मोठी उत्सुकता होती. प्रभाग १५ आणि प्रभाग १९ मध्ये तीन सदस्य वगळता उर्वरित २९ प्रभागांमध्ये चार सदस्यांची रचना आहे. मतदानाप्रसंगी ज्या प्रभागांमध्ये कमी संख्येने उमेदवार होते त्याठिकाणी दोन ते तीन तर जास्त उमेदवार संख्या असलेल्या प्रभागात चार मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, मतदान करताना अनेकांचा गोंधळ उडाल्याने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना मतदारांच्या प्रबोधनाची भूमिका घ्यावी लागली. दरम्यान, शहरात २७९ संवेदनशील व ८८ क्रिटीकल केंद्रे निश्चित करण्यात आली होती. याठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने किरकोळ तणाव व वादविवादाचे प्रसंग वगळता अनुचित घटना घडली नाही. पंचवटीतील हिरावाडी येथील शाळा क्रमांक ५५ मध्ये बाहेर जमा झालेली गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सिडकोतील प्रभाग २८ मध्ये भाजपा-सेना कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केल्यानंतर तणाव निवळला. उत्तमनगर येथील जनता विद्यालयातील मतदान केंद्राबाहेर मतदारांना घेऊन येणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले, तर नाशिकरोड येथील प्रभाग २२ मध्ये बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी आल्या. जुन्या नाशिकमधील रंगारवाडा या शाळेतील मतदान केंद्राजवळील बूथ २०० मीटरच्या आत असल्याने पोलिसांनी ते अन्यत्र हलविल्याने उमेदवार समर्थक व पोलीस यांच्यात किरकोळ वादविवादाचा प्रसंग घडला.
शहरात मतांचा टक्का वाढला
By admin | Updated: February 22, 2017 01:36 IST