नाशिक : पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याबाबत महापालिका प्रशासनाला ३० नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाचे असतानाही त्यावर विचार न करता पुन्हा सहा महिन्यांसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आल्याने सदस्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला आणि फेरनिविदा काढण्यावर ठाम राहत केवळ ३१ डिसेंबरपर्यंतच मुदतवाढीला मान्यता दिली.पेस्ट कंट्रोलचा ठेका दिग्विजय कंपनीला देण्यास स्थायी समितीने यापूर्वीच विरोध केला आहे. स्थायीने आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर आयुक्तांनी स्थायीचा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविला आहे, तर दिग्विजय कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली आहे. न्यायालयानेही ३० नोव्हेंबरपर्यंत पेस्ट कंट्रोल ठेक्याप्रकरणी उचित निर्णय घेण्याचे आदेशित केले आहे. प्रशासनाकडून न्यायालयाच्या निर्णयाची कार्यवाही होणे अपेक्षित असताना प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत जादा विषयाच्या माध्यमातून पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यास पुन्हा सहा महिने मुदतवाढीचा प्रस्ताव आणला. यावेळी यशवंत निकुळे यांनी सदर मुदतवाढीस विरोध दर्शवित केवळ ३० नोव्हेंबरपर्यंतच मुदतवाढ देण्याची सूचना केली. प्रा. कुणाल वाघ यांनीही विरोध दर्शवित फेरनिविदा काढण्याची मागणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी शासन आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली, तर आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी येत्या ९ डिसेंबरला सुनावणी असल्याने जोपर्यंत शासन-न्यायालयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मुदतवाढीची मागणी केली. मात्र, प्रा. कुणाल वाघ यांनी शासन व न्यायालयाच्या तारखा लांबविल्या जात असल्याने त्याचा फायदा ठेकेदारालाच होणार असल्याचा आरोप केला. अखेर सभापती शिवाजी चुंभळे यांनी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत प्रशासनाने पेस्ट कंट्रोलबाबत निर्णय घेऊन फेरनिविदा काढावी. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून न्यायालयाचे आदेश असताना प्रशासनाने नेमकी काय कार्यवाही केली, असा सवालही चुंभळे यांनी विचारला. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देत फेरनिविदा काढण्यावर स्थायी समिती ठाम असल्याचा पुनरुच्चार चुंभळे यांनी केला.
पेस्ट कंट्रोल ठेका; दोनच महिने मुदतवाढ
By admin | Updated: November 9, 2015 23:43 IST