नाशिक : सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे करण्यात आल्यानंतर सध्या पालक आणि शिक्षण संस्थांची अशा प्रकारचे आधारकार्ड काढून घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. तथापि, अपुऱ्या यंत्रणेमुळे अद्याप पाच लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड निघूच शकलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात अशा प्रकारे मुलांसाठी अतिरिक्त मशिन्स उपलब्ध करून देण्यात येणार असून, शहरात शाळा-शाळांमध्ये जाऊन आधारकार्ड काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण खात्याने काही वेगळे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याचे आधारकार्ड काढण्यात येणार आहे. त्यामुळे खरी पटसंख्या कळण्यास मदत होईल आणि बोगस पटसंख्येला आळा घालण्यास मदत होईल, असे शिक्षण खात्याचे म्हणणे आहे. तथापि, आधारकार्ड काढण्यासाठी सध्या मोठी समस्या निर्माण झाली आहे. आधारकार्ड काढण्यासाठी यापूर्वी मोहिमा राबविण्यात आल्या तेव्हा नगरसेवकांनी एकाच प्रभागात दोन चार ठिकाणी केंद्रे सुरू करून नागरिकांची सोय केली होती. परंतु नंतर केंद्रे कुठे चालू आहेत, याबाबत स्पष्ट नियोजन नाही. कधी महापालिकेचे विभागीय कार्यालय तर कधी भविष्य निर्वाह निधी कार्यालय अशा विविध ठिकाणी आधारकार्ड सुरू असले तरी सद्यस्थितीत कोठे अशाप्रकारचे काम सुरू आहे, याची माहिती अधिकृतरीत्या दिली जात नसल्याने पालकांची पायपीट होत आहे. केवळ नाशिक शहरचे नव्हे तर मालेगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हेच चित्र आहे. जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय खासगी शाळा आश्रमशाळा यांचा विचार केला, तर पहिली ते बारावी इयत्तेतील एकूण १२ लाख ६४ हजार विद्यार्थी असून, त्यापैकी पाच लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढणे बाकी असल्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी सांगितले. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक आणि अन्य जिल्हा प्रशासनाशी चर्चा झाली असून, त्यांनी ग्रामीण भागात अतिरिक्त आधारकार्ड मशीन्स उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे लवकरच हे काम सुरू होईल. १५ आॅगस्टपर्यंत उर्वरित पाच लाख विद्यार्थ्यांचे आधारकार्ड निघतील आणि त्याची नोंदही शिक्षण खात्याकडे होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक शहरात लाख १४ हजार विद्यार्थी आधारकार्डविना आहेत. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक आणि त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे बैठक घेण्यात आली. त्यात ठरल्यानुसार आता प्रशासन आता अतिरिक्त यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यात येणार आहे. अकारण पायपीट करू नये, अशी सूचना देण्यात आल्याचे महापलिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी उमेश डोेंगरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालकांची पायपीट : शहरात शाळा-शाळांमध्येच होणार व्यवस्था
By admin | Updated: July 19, 2015 00:47 IST