सामाजिक सहजीवनाची हाक देणारी पंढरीची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:15 AM2019-07-05T00:15:49+5:302019-07-05T00:16:15+5:30

वारकरी मंडळाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अभ्यास दौरा करीत असताना दरवर्षी माउलींची दिंडी, संत तुकाराम महाराज दिंडी सोहळा, संत मुक्ताबाई दिंडी सोहळा, पैठणचे संत एकनाथ महाराज दिंडी सोहळा या सर्व दिंड्या जवळून अनुभवल्या आहेत.

Pandharvi Vr, who calls social life | सामाजिक सहजीवनाची हाक देणारी पंढरीची वारी

सामाजिक सहजीवनाची हाक देणारी पंढरीची वारी

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्राच्या खास धार्मिक वैशिष्ट्यात आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना फार महत्त्व

वारकरी मंडळाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अभ्यास दौरा करीत असताना दरवर्षी माउलींची दिंडी, संत तुकाराम महाराज दिंडी सोहळा, संत मुक्ताबाई दिंडी सोहळा, पैठणचे संत एकनाथ महाराज दिंडी सोहळा या सर्व दिंड्या जवळून अनुभवल्या आहेत. महाराष्ट्राच्या खास धार्मिक वैशिष्ट्यात आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींना फार महत्त्व आहे. एक आहे शयनी एकादशी तर दुसरी आहे प्रबोधिनी एकादशी होय. नववधूला ज्याप्रमाणे दिवाळीच्या सणाला माहेरचा ओढा असतो त्याप्रमाणे वारकरी भाविक यांना पंढरीची ओढ असते, ‘पंढरीये माझे माहेर साजणी!’ आणि ‘माझे माहेर पंढरी! आहे भिवरेच्या तीरी!!’ तसेच ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता! पंढरीची वारी आहे माझे घरी!’ नववधूला ज्याप्रमाणे सासरी आपले माहेरच्या आई-वडील भाऊ, बहिणीची आठवण होते त्याचप्रमाणे वारकरी भाविकांना आपल्या इष्टदेवतेची म्हणजेच पांडुरंगाची आठवण होते व मी केव्हा पंढरीला जाईल, अशी तळमळ वाटते. पंढरी त्यांचे माहेर, पांडुरंग त्यांचा पिता, चंद्रभागा त्यांची बहीण, पुंडलिक त्यांचा भाऊ यांना कधी भेटेन, अशी मनात प्रेमाची सदिच्छा असते. सासरी बंधने माहेरी मुक्तता. सासरी दु:ख तर माहेरी सुख असते. सासरी काम असते तर माहेरी आराम असतो. वारी हा नुसता प्रवास नसून दैनंदिन जीवनात केलेला बदल आहे, तेच ते विचार, आचार, व्यापार करण्यापेक्षा वेगळी व आनंददायी यात्रा म्हणजे वारी होय. आनंदाने आनंदासाठीच चालायचे, इतरांचे विचार व अनुभव समजून घेणे, सुख-दु:खाची देवाण-घेवाण करणे, शारीरिक व्यायाम, नवदृष्टी, नवीन मित्रमंडळी, अनेक विषयांचे चर्चासत्र म्हणजे वारी. प्रेमाची मात, देवाची साथ, सेवेचा हात म्हणजे वारी होय. वारी ही शरीरासाठी दवा, मनासाठी दावा, बुद्धीसाठी दुवा हीच वारीची हवा. या वारीत आपला अहंकार गळून पडतो. मोठेपणा, पदप्रतिष्ठा विसरणे म्हणजे वारी होय. प्रतिष्ठित, धनवान, जगमान्य लोक हे लोकमान्य होतात, देवमान्य होतात व आपलं मोठेपण विसरून गळ्यात टाळ घेऊन हरिनामात दंग होतात, हे वारीचं वैभव व मोठेपण आहे. सामाजिक सहजीवनाची हाक निर्माण होणं वारी आहे. कपाळी गंध, मनाला नामाचा छंद, हृदयामध्ये गोविंद ही वारीची अंतरंग साधना आहे व गळ्यामध्ये तुळशीची माळ, हातामध्ये टाळ एकादशीला करतो फराळ, जो प्रपंच विसरतो, तो खरा वारकरी होय. एकनिष्ठ असणे हेच त्यांचे ज्ञान आहे.
सगुण उपासना ही वारकरी भाविकांचा आत्मा आहे, ज्ञानेश्वरी व गाथा या व्यतिरिक्त कोणत्याही ग्रंथाला महत्त्व न देणं ही निष्ठा, सतत नामचिंतन करणे, जे भक्ती, प्रेम या तत्त्वाला मानतात त्यांचीच संगत करणे, सर्व भार देवांवर टाकून निश्चिंत राहणं, घडेल तेवढी संतसेवा करणे, आत्मनिर्भर राहणे, देवासाठी शरीर झिजवणे, ‘देह समर्पिजे देवा! भार काहीच न घ्यावा! होईल आघवा! तुका म्हणे आनंद!!’ दिंडी वारीमध्ये कोणतेही भजन म्हणत नाही, नियमाचे भजन होते. वारी भक्तीप्रेमाचा आविष्कार आहे. नाहीतरी घराला घरपण व माणसाला मोठेपण ज्ञानापेक्षा प्रेमाने येते ते प्रेम देवाचे देणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘प्रेम देवाचे हे देणे! देह भाव जाय जेणे!!’ बाहेर देव दिसत नाही, असे आधुनिक चिंतकाचे मत असले तरी ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल’ तसेच ‘तुका म्हणे लक्ष ठेवोनी अंतरी! तोची वारकरी पंढरीचा!!’ श्वासावर लक्ष ठेवून नामसाधना अशी आध्यात्मिक वारी घडावी हाच वारीचा खरा उद्देश आहे. वारी म्हणजे येरझार, येणे आणि जाणे संपणे. माउली म्हणतात, ‘याची एकेपरी! पकाचिये कुसरी! सारीतसे वारी संसाराची!!’ जन्ममरणाची येरझार संपणे म्हणजे वारी, विकार संपणे म्हणजे वारी होय. तेथ सरली वारी क्र ोधाचिये!! त्याकरिता पंढरीची मुख्य वारी दोन प्रकारात एक आषाढी व दुसरी कार्तिकी, खुद्द भगवंताचे मनोगत संत नामदेव महाराज एका अभंगात सांगतात, ‘आषाढी कार्तिकी विसरु नका मज! सांगतसे गुज पांडुरंग!!’ उपरोक्त नियमावली ही वारकरी साधना आहे आणि या प्रकारे पंढरीची वारी जे करतात ते मोक्षाचे अधिकारी आहेत, असे तुकाराम महाराज म्हणतात. ‘पंढरीचे वारकरी! ते अधिकारी मोक्षाचे!!’
(लेखक अ.भा. वारकरी मंडळ,
नाशिक जिल्हाध्यक्ष आहेत.)

 

 

 

 

 

Web Title: Pandharvi Vr, who calls social life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.