इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावर पांडवनगरी बसथांब्यालगत अनधिकृत भरणाऱ्या भाजीबाजारामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. या ठिकाणचा भाजीबाजार हटवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.कलानगर ते पाथर्डीगावापर्यंत वडाळा-पाथर्डी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. यामध्ये रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून त्यामध्ये खजुराची व शोभिवंत झाडे लावण्यात आली आहेत. तसेच पादचाऱ्यांसाठी पदपथही तयार करण्यात आले. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. या रस्त्यालगतच शरयूनगर, समर्थनगर, पांडवनगरी, सार्थकनगर यांसह विविध उपनगरे आहेत. तसेच तीन प्राथमिक व माध्यमिक विद्यालये तर दोन महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. परंतु सायंकाळी पांडवनगरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे २० ते २५ भाजीविक्रेते व खाद्यपदार्थांच्या हातगाड्या उभ्या राहतात. येथे येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांना अडथळ्याची शर्यत करावी लागते. त्यातूनच लहान-मोठ्या अपघातांची संख्या वाढली आहे. रस्त्यावर विक्रेत्यांना बसण्यास परवानगी नसतानाही सर्रास नियमांचे उल्लंघन होत असूनही मनपाचे अतिक्रमण विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)
पांडवनगरी बसथांब्यालगत भाजीबाजारामुळे कोंडी
By admin | Updated: March 8, 2016 00:17 IST