येवला : येवल्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पालखेडचे आवर्तन सोमवारी सुटणार असल्याच्या माहितीला नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, मुख्याधिकारी राहुल वाघ दिली. सोमवारी धरणाच्या मुखातून पाणी सुटल्यानंतर अडथळा आला नाही तर तीन दिवसांनी येवला साठवण तलावात पाणी येणार आहे. सध्या शहराचा साठवण तलाव पूर्णत: कोरडा आहे. जानेवारीत आलेल्या पालखेडच्या पाणी आवर्तनाने सलग सातव्या दिवशी पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावाने तळदेखील झाकलेला नव्हता. या परिस्थितीला संपूर्ण कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून होणारा अनधिकृत उपसा कारणीभूत ठरला होता.तत्कालीन परिस्थितीत पालखेड कालव्याचे प्रशासन, पोलीस, या सर्वांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेली होती. यावेळी स्वत: जिल्हाधिकारीच सतर्क असल्याने पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडे योग्य ते मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि पाणीचोरी थांबेल व येवल्याची तहान पूर्ण क्षमतेने भागेल, अशी अपेक्षा आहे. सध्या येवला शहरावरचे पाणी संकट गहिरे झाले आहे. गेल्या १५ दिवसांपासून पालिका शहरवासीयांना नळाद्वारे पाणी देऊ शकलेली नाही. केवळ टॅँकरद्वारे स्वयंसेवी संस्था व राजकीय पक्षांकडून पाणीवाटप चालू आहे. पालिकेचा टॅँकर जणू काही स्वत:चाच आहे या अविर्भावात काही नगरसेवक स्वखर्चाने पाणीवाटप करत असल्याचा दिखावा करीत आहे. आता मात्र पालिका या टॅँकरवर फलक लावत असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. विशिष्ठ भागात वारंवार पाणी टॅँकर पाठवले जात असल्याचे चित्र आहे. तर काही भाग सातत्त्याने दुर्लक्षित होत आहे. शहरात पिण्यासाठी पाण्याची तीव ्रटंचाई निर्माण झाली असून नागरिक पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहे. येवले शहराला पाणी मिळण्यासाठी कमीत कमी १५० क्युसेस इतका वेग असणे गरजेचे आहे. तरच साठवण तलावात पाणी मिळते. पिंपळगाव, निफाड, विंचूर येथे मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी झाली होती. त्यामुळे येवला साठवण तलावात अत्यंत कमी दाबाने पाणी आल्याचा इतिहास ताजा आहे. या पाणी आवर्तनात चोरी रोखण्यासाठी राज्य राखीव दलासह पुरेसा पोलीस फोर्स वापरणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी येवला भेटीत सांगितले होते. त्यामुळे या आवर्तनातून तलाव भरला जाईल ही अपेक्षा आहे. जानेवारीच्या आवर्तनात कालव्याच्या मुखातून सोडलेल्या पाण्यात ० ते ९५ किमीपर्यंत १०० टक्क्यापैकी फक्त ८.५ टक्के पाणी येवल्याला मिळाले आहे. म्हणजे सुमारे ९१ टक्के पाणी गळती झाली. हा चिंतनाचा विषय आहे. यावेळी पालखेड विभागाने डोंगळे काढण्याची कार्यवाही केली आहे. स्वत: कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी हे डोंगळे काढण्याबाबत आग्रही भूमिका घेताना दिसत आहे.(वार्ताहर)
येवल्यासाठी आजपासून पालखेडचे आवर्तन
By admin | Updated: April 4, 2016 00:10 IST