नाशिक : शहरातील सर्वाधिक गजबजलेले ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई नाका परिसरात सर्रासपणे मद्यपींच्या ओल्या पार्ट्या अन् जुगाराचे डाव रंगत असून येथील नवीन पोलीस ठाणे मात्र अनभिज्ञ असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबई नाका परिसराचा विस्तार वाढल्याने या भागात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्यामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे विभाजन करून मुंबई नाका पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले; मात्र अद्याप मुंबई नाका भागातील गुन्हेगारीच्या घटना कमी होत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. महामार्ग बसस्थानकाचा आवार पोलिसांना वर्ज्यच आहे की काय, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. गायकवाड सभागृहाच्या मागील रस्त्यावर रात्रीच्या सुमारास तसेच भर दुपारी मद्यपींचे टोळके धुडगूस घालत रस्त्यावर रिकाम्या बाटल्या फोडतात. मात्र हे अद्याप मुंबइर् नाका पोलीस ठाण्याच्या गस्त पथकाच्या निदर्शनास येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जॉगिंग ट्रॅकमध्ये टवाळखोर, मद्यपी, जुगाऱ्यांचा रात्रंदिवस ठिय्या असतो. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. भाभानगर, हिरवेनगर, मुंबई नाका, गायकवाडनगर हा सर्व भाग पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे, तरीदेखील रात्रीच्या वेळी या परिसरात पोलीस गस्त होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
मुंबई नाक्यावर ओल्या पार्ट्या, जुगाराचे डाव
By admin | Updated: March 18, 2016 00:12 IST