यावर्षी कोरोनाच्या साथीला आळा बसत नाही तोच डेंग्यूने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तब्बल ६०हून अधिक रुग्ण या शिंगवे बहुलासह परिसरात गेल्या आठवड्यात आढळून आले असल्याचे नगरसेवक बाबूराव मोजाड यांनी सांगितले. डेंग्यूचे वाढते रुग्ण पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार व आरोग्य अधीक्षक राजिंदरसिंह यांच्याकडे उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाने दखल घेत शिंगवे बहुला, अंबाडवाडी, सोनेवाडी, टीएरोड आदी भागांत जात डासांची उत्पत्ती होत असलेल्या ठिकाणांवर फवारणी, मोकळ्या भूखंडावर मॅलोवीन पावडर फवारणी, घराघरांत फ्रिजमध्ये निर्माण होणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी बार्सिलो टॅबलेटचे वाटप केले जात आहे. याशिवाय गाड्यांचे रिकामे टायर जप्त करण्यात येत असून, नागरिकांचे पाणी साठा करण्याची ठिकाणेदेखील स्वच्छ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
डेंग्यूचा प्रकोप; छावणीत फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST