नाशिक : झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अन्य कोणत्याही प्रकारची आपत्ती उद्भवू नये, यासाठी आरोग्य विभागाच्या विभागातील विविध इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट एका दिवसात करण्याचे आदेश नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. बी. भोसले यांनी दिले आहेत.
झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनेमुळे आरोग्य विभागाच्या इमारतींच्या काही त्रुटी प्रशासनाच्या नजरेस आल्या. त्या त्रुटींची गंभीर दखल सार्वजनिक विभागाच्या वतीने घेण्यात आली आहे. मुख्य अभियंता पी. बी. भोसले यांनी त्यांच्या परीक्षेत्रामध्ये येणाऱ्या नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार या पाचही जिल्ह्यांच्या अधीक्षक अभियंत्यांना एका आदेशानुसार आरोग्य विभागासाठी बांधण्यात आलेल्या इमारती तसेच वेगवेगळ्या यंत्रसामग्रीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याबाबतची माहिती नाशिकच्या कार्यालयात शुक्रवारपर्यंत देण्याचे आदेशदेखील निर्गमित करण्यात आले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट करताना आरोग्य विभागाने निर्माण केलेल्या वातानूकुलित यंत्रणा ऑक्सिजन पुरवठ्याची सामग्री यासह इमारतीची सद्यस्थिती काय आहे, त्याचा अहवाल देणे बंधनकारक आहे. तसेच ग्रामीण भागांमध्ये इमारतींची आणि यंत्रसामग्रीची परिस्थिती काय आहे, त्याची सविस्तर माहिती देण्याचे आदेश मुख्य अभियंता भोसले यांनी उत्तर महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.