सटाणा : ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेमधून वगळलेल्या सटाणा नगरपालिकेचा तत्काळ समावेश करावा, असे आदेश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना दिले.सटाण्याचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी सोमवारी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची मालेगावी भेट घेऊन सटाणा नगरपालिकेचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करण्याची मागणी केली. डॉ. सुभाष भामरे यांनी सटाणा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मागणीची तत्काळ दखल घेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी खोडके व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन अधिकारी किशोर माळोसकर यांच्याशी संपर्कसाधला. प्रधानमंत्री आवास योजनेमधून सटाणा नगरपालिका वगळली कशी, असा सवाल करीत सटाणा पालिकेचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करण्याचे आदेश दिले. यामुळे सटाणा नगरपालिकेचा योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०२२ पर्यंत देशातील सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना घोषित करण्यात आली आहे. डॉ. भामरे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या असून, लवकरच सटाणा पालिकेला प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. भामरे यांनी दिले आहे. यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष निर्मला भदाणे, आघाडीचे गटनेते संदीप सोनवणे, नगरसेवक दीपक पाकळे, मुन्ना शेख, राकेश खैरनार, बाळू बागुल, मनोहर देवरे, नगरसेवक संगीता देवरे, पुष्पा सूर्यवंशी, भारती सूर्यवंशी, सोनाली बैताडे, सुनीता मोरकर, डॉ. विद्या सोनवणे, कोमल मोरकर, दत्तू बैताडे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)
योजनेत समावेश करण्याचे आदेश
By admin | Updated: April 4, 2017 01:17 IST