जायखेडा : बागलाण तालुक्यात सोमपूर शिवारात विहीर खोदून जलवाहिनीद्वारे बाहेरगावी पाणी घेऊन जाण्यास सोमपूर ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. सोमपूर शिवारातून लाडूद शिवारात जात असलेले जलवाहिनीचे काम संतप्त ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. दिवसेंदिवस वाढती पाणीटंचाई लक्षात घेता सोमपूर ग्रामपंचायतीने २०१२ मध्ये सोमपूर शिवारातून बाहेर गावी पाणी न जाऊ देण्याचा ठराव केला आहे. यात सोमपूरच्या शेतकर्यांनी बाहेरगावच्या शेतकर्यांना विहिरी खोदण्यासाठी जागा देवू नये व सोमपूर शिवारातील पाणी जलवाहिनीद्वारे बाहेरगावी जावू नये असा निर्णय घेतला आहे. सोमपूर हे गाव मोसम नदीकाठी असल्याने परिसरातील अनेक मोठे शेतकरी येथे मोठ्या किंमती देवून विहिरीसाठी जमिनी विकत घेतात व त्या जमिनींवर विहिरी खोदून जलवाहिनीद्वारे पाणी वाहून नेतात. यामुळे येथे बेसुमार पाणी उपसा होत असून येथील भूगर्भातील जलसाठ्यावर त्याचा दुष्परिणाम होत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची व शेती सिंचनाच्या पाण्याची समस्या बिकट होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथून पाणी घेऊन जाण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. लाडूद, बिजोटे, निताणे या गावांच्या पाणी पुरवठ्याच्या जलवाहिन्या व परिसरातील गावांच्या शेतकर्यांच्या जलवाहिन्या येथूनच गेल्या आहेत. या जलवाहिण्यांना कुठलाही विरोध न करता नवीन जलवाहिण्या जावू देण्यास या ग्रामस्थांचा विरोध आहे. अशाही परिस्थितीत लाडूद येथील शेतकरी नवीन जलवाहिनी टाकून लाडूद शिवारात शेतीसाठी पाणी घेऊन जात आहे. या शेतकर्यांची पहिलेच एक जलवाहिनी कार्यान्वित असताना व सोमपूर गावाचा एकमुखी ठराव झाला असताना नवीन जलवाहिनी जात असल्याने ग्रामस्थांचा त्यास तीव्र विरोध आहे. सदर शेतकर्याने तहसीलदारांच्या मदतीने ज्या शेतकर्यांच्या शेती क्षेत्रातून जलवाहिनी जाणार आहे त्यांना नोटीसा पाठवून जलवाहिनीस विरोध न करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र जलवाहिनी जावू न देण्याच्या निर्णयावर ग्रामस्थ ठाम आहेत. लाडूद येथील शेतकर्याने आज पोलीस संरक्षणात जलवाहिनी नेण्याचा प्रयत्न केला; मात्र सोमपूर येथील शेकडो स्त्री-पुरुष नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. कुठल्याही परिस्थितीत जलवाहिणी जावू देणार नाही असा पवित्रा जल बचाव समिती व सदस्यांनी घेतला. शासकीय प्रतिनिधी म्हणून आर. एस. महाले यांनी चर्चा केली. मात्र त्यात यश आले नाही. यावेळी सरपंच सौ. सविता नहिरे, पंढरीनाथ नहिरे, प्रविण भामरे, प्रमिला भामरे यांनी गावकर्यांची भूमिका मांडली.
सोमपूर शिवारातून पाणी देण्यास विरोध
By admin | Updated: May 6, 2014 22:26 IST