घोटी : इगतपुरी तालुक्यातील शेकडो हेक्टर सुपीक शेतजमिनी शासनाने संपादित केलेल्या असताना आता शिल्लक राहिलेल्या जमिनीही संपादित करण्याचे धोरण असून, तालुक्यातील मुंबई - आग्रा महामार्गावर असणाऱ्या मुंढेगाव येथील ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणारी तब्बल चारशे एकर गायरान कुरण जमिनीवर शासन चित्रनगरी उभारण्याच्या विचारधीन असल्याने, या जमिनीवर चित्रनगरी उभारू नये, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या विशेष ठरावाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव शिवारात महामार्गालगत असणारी गायरान जमीन शासनाने विविध प्रयोजनासाठी वापरली असताना आता शिल्लक असलेल्या चारशे एकर जागेवर चित्रनगरी उभारण्याचे शासनाच्या चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी कार्यवाही सुरू झाली असून, या बाबीला स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी कडवा विरोध दर्शविला आहे.शासनाने या जागेवर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी चार हेक्टर, आदिवासी विकास विभागाकरिता २.२० हेक्टर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी १८५० चौ.मी. भौगोलिक सुधारणा पाणी आणि हायवेसाठी १.१०० क्षेत्र, राखीव भूसरल परिवहन भारत सरकारसाठी ४९५६ चौ.मी. व जिल्हास्तरीय व विभागस्तरीय प्रशिक्षण केंद्र आदि बाबीसाठी शासनाने जागा घेतल्यानंतर उर्वरित जागा चित्रनगरीसाठी ताब्यात घेण्याचे शासनाचे धोरण आहे. ही जमीन ताब्यात घेतल्यास ज्या उद्देशासाठी ही जमीन स्थानिक ग्रामपंचायतीने राखून धरली आहे तो संपुष्टात येईल. ही जमीन गायरान कुरण असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने ही जमीन चित्रनगरीसाठी वापरू नये, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
चित्रनगरी उभारण्यास विरोध
By admin | Updated: March 21, 2016 23:12 IST