ठेंगोडा : सटाणा नगरपालिकेला बंधारा बांधण्यासाठी जमीन देण्यास ठेंगोडा ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून, तसा ठराव ग्रामसभेत करण्यात आला. सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी सटाणा नगरपालिकेने ठेंगोडा ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ६६३ व ६७२ मधील तेरा हेक्टर जमीन साठवण बंधारा बांधण्यासाठी ठेंगोडा ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती. सदर जमीन देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी ठेंगोडा ग्रामपंचायतीची खास ग्रामसभा बोलविण्यात आली होती. सरपंच अंजनाबाई मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत सदर जमीन नगरपालिकेस देण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला असून, तसा एकमुखी ठराव करण्यात आला आहे. सदर जमिनीत आज वनविभागाचे वीस ते पंचवीस वर्षे जुनी झाडे आहेत तसेच पर्यावरण संतुलित ग्राम योजनेअंतर्गत व नरेगाअंतर्गत वृक्षलागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. असे असताना साठवण बंधारा बांधण्यास जमीन कशी द्यायची असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावेळी सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंधाऱ्यासाठी जमीन देण्यास ठेंगोडा ग्रामस्थांचा विरोध
By admin | Updated: July 24, 2014 00:58 IST