नाशिक : जिल्ह्यात नवीन कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ अवघी ३९६ असताना बळींची संख्या ५८ पर्यंत गेली आहे. रविवारी बळी गेलेल्यांची संख्या २९ तर त्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात सोमवारी बळी गेलेल्यांची संख्या थेट दुप्पट झाल्याने बळींच्या आकडेवारीबाबत जनसामान्यांत साशंकता आहे.
जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या बाधितांच्या तुलनेत सातत्याने अधिक राहत आहे. मात्र, बळींच्या संख्येत अचानक पुन्हा वाढ होऊ लागल्याने ही बळींची वाढ नक्की एकाच दिवसातील आहे की, काही अन्य दिवसांचे बळी यंत्रणेवर अपलोड करायचे राहून गेल्याने ते महिनाअखेरच्या दिवसातील बळींमध्ये भर घालून देण्यात आले, असा प्रश्न त्या निमित्ताने सामान्य नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे. तसेच बळींची अचानक झालेली वाढ जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सोमवारी एकूण उपचारार्थी रुग्णांच्या संख्येत अजून घट होऊन ही संख्या ९५८१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये १६८, तर नाशिक ग्रामीणला २१६ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ७, तर जिल्हाबाह्य ५ रुग्ण बाधित आहेत. तसेच जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात २०, ग्रामीणला ३६ आणि मालेगाव मनपात २ असा एकूण ५८ जणांचा बळी गेला आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या घटत असली तरी प्रदीर्घ काळापासून उपचार घेऊनही बरे न झालेले रुग्ण दगावत असल्यानेच बळींच्या संख्येत वाढ दिसत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ९६ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९६.२९ टक्क्यांवर पाेहाेचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९७.१४ टक्के, नाशिक शहर ९७.१७, नाशिक ग्रामीण ९५.५०, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८९.४३ टक्क्यांवर पाेहोचला आहे.
इन्फो
प्रलंबित अहवाल दोन हजारांखाली
जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या घटून १८३० वर आली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या घटू लागल्याने आता एका दिवसातच अहवाल मिळू लागले आहेत. त्यामुळेच शनिवारी नाशिक शहरातील ४४२, नाशिक ग्रामीणचे ९२९, तर मालेगाव मनपाचे ४५९ असे एकूण १८३० अहवाल प्रलंबित आहेत.