मालेगाव कॅम्प : मालेगावच्या उपप्रादेशिक वाहन कार्यालयात सध्या वाहन परवाना, स्मार्टकार्ड, आॅनलाइन रिक्षा परवाना आदिंमुळे गदारोळ उडाला असून शेकडो वाहनधारकांच्या तक्रारींमुळे लोकप्रतिनिधींनी याबाबत अधिकार्यांना धारेवर धरले; परंतु अधिकार्याने सर्व प्रकरण खाजगी कंपनी माध्यावर ढकलले. यामुळे कंपनीपुढे कार्यालयाची हतबलता स्पष्ट दिसून आली. त्यामुळे या घटनांमध्ये वरिष्ठ अधिकार्यांची कंपनीवर मेहरनजर असल्याचा वाहनधारकांनी आरोप केला. मालेगावच्या उपप्रादेशिक वाहन कार्यालयातुन वाहन परवाना मिळाल्यास विलंब, वाहनांच्या मुळ कागदपत्राचे संगणकीय स्मार्ट कार्ड मिळण्यास तब्बल सहा महिने वाट पाहावी लागत आहे. तसेच कार्यालयात दलालांची चलती झाली आहे. यात वाहन परवाना तयार झाल्यावर तो आठ, पंधरा दिवसांत पोस्टामार्फत संबंधीत वाहनचालकास पाठवण्यात येतो; परंतु परवान्याचे टपाल वेळेवर न पोहचल्यास त्यास विलंब झाल्यास त्याचे खापर हे कार्यालय पोस्ट खात्यावर फोडते तसेच वाहनांच्या स्मार्ट कार्डबद्दल मोठा गोंधळ उडाला आहे. सहा, आठ महिन्यांचा प्रतिक्षेनंतर कार्ड मिळत नाही. याबाबत विचारणा केल्यावर परिवहन अधिकार्यांनी नेहमी प्रमाणे कार्ड छपाई करणार्या खाजगी कंपनीकडे बोटे दाखवली. मालेगाव कार्यालयात सध्या कर्मचारीवर्ग अपुरा असल्याचे सांगण्यात आले तसेच वरिष्ठ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुधाकर मोरे यांचा चेहरा अद्याप शहरवासियांनी पाहिलेला नाही. मोरे मालेगाव कार्यालयात रूजू झाल्यावर अनेकदा रजेवर असल्याचे कार्यालयातुन सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचे दुर्लक्ष असल्याचे खुद्द येथील अधिकार्यांसह कर्मचारी सांगतात. त्यामुळे कामकाजावर कुणाचेही नियंत्रण दिसून येत नसल्याचा आरोप वाहनधारकांनी केला. लवकर येथील सर्व कामे नियमित व्हावे अशी मागणी होत आहे.
आॅनलाइन रिक्षा परवाना
By admin | Updated: June 2, 2014 01:18 IST