नांदूरशिंगोटे: सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे उपबाजार आवारात शुक्रवार (दि.२४) रोजी कांद्याची विक्रमी अकरा हजार १०० क्विंटल आवक झाली होती. मात्र बाजारभावाच्या तुलनेत येथे भावात ३०० ते ४०० रूपयांची घसरण झाली. कांद्यास सरासरी प्रती क्विंटल २८०० रूपयांच्या आसपास भाव मिळाला. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नांदूरशिंगोटे व दोडी ब्रुद्रुक येथे उपबाजार आवार आहे. नांदूरशिंगोटे येथे आठवड्यातून सोमवार व शुक्र वार तसेच दोडी येथे बुधवारी कांदा लिलाव असतात. गेल्या काही आठवड्यापासून दोन्हीही ठिकाणी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. येथील उपबाजारात शेतकऱ्यांना कांदा विक्री केल्यानंतर रोख स्वरूपात पेमेंट मिळत असल्याने पसंती आहे. शुक्रवारी दुपार पासूनच शेतकऱ्यांची उपबाजारात कांदा विक्रीसाठी वाहनांची वर्दळ सुरु झाली होती. सायंकाळी सहा ते सातवाजेच्या दरम्यान उपबाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने कांद्याचे शेड हाऊसफुल झाले होते. त्यामुळे काही व्यापाºयांनी उर्वरित कांदा शेडच्या बाहेर मोकळ्या जागेत ठेवला होता. अचानक वाहनांची गर्दी वाढल्याने प्रवेशद्वारवर गर्दी झाली होती. त्यामुळे नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस कर्मचाºयांच्या मदतीने बसस्थानकपासून कांदा घेवून आलेल्या वाहनांची रांगा लावण्यात आल्या होत्या. वाहनांची उपबाजार आवारात व रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत वजनकाटे व लिलाव सुरू होते. गत आठवड्याच्या तुलनेत हजार रूपयांच्या आसपास भावात घसरण झाली. आज येथे २०५५० च्या आसपास कांदा गोणी म्हणजे ११ हजार १०० क्विंटल आवक होती. कांद्यास सरासरी २८०० जास्तीत जास्त ३६०० व कमीत कमी ४०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, उपसभापती सुधाकर शिंदे, सचिव विजय विखे, उपसचिव आर. एन. जाधव, पी. आर. जाधव यांनी दिली.
नांदूरशिंगोटेत कांद्याची विक्रमी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 15:19 IST