अमोल अहिरे
जळगाव निंबायती - आषाढातील कोसळणाऱ्या पाऊसधारा, कुरकुरीत भजींसोबत रंगणाऱ्या गप्पा अशी छान मैफल कांदे नवमीला रंगत जाते. खवय्यांच्या जिभेवर मग कुरकुरीत भजींचा स्वाद तिखट गोड चटणी बरोबर घुटमळत राहतो. गतवर्षीप्रमाणे यंदाही खवय्ये कुरकुरीत भजींच्या सामूहिक कार्यक्रमाला मुकले. लॉकडाऊनमुळे यंदा आनंद काहीसा हिरावला गेला.
चातुर्मासाला प्रारंभ होण्यापूर्वी येणारी नवमी म्हणजे ‘कांदेनवमी’. आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिकी शुद्ध एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. चातुर्मास म्हणजे वर्षातले चार महिने, कांदा, लसूण, वांगे आदी खाद्यपदार्थ वर्ज्य करायचे. मग ते बंद करण्यापूर्वी भरपूर खाऊन घ्यायचे, म्हणून मोठी एकादशीपूर्वी अर्थात आषाढ शुद्ध नवमीला कांदे नवमी साजरी करायची प्रथा आहे. खरं म्हणजे पावसाळ्यात कांदा सडल्यासारखा होतो, म्हणून चातुर्मासात वर्ज्य केलेला आहे तसेच वांगीदेखील वर्ज्य केले जातात. यादिवशी वाफाळलेल्या चहासोबत कुरकुरीत कांदा भजी, कांद्याची खेकडा भजी, कांदे पोहे, कांद्याची साधी भजी, कांद्याची पीठ पेरलेली भाजी, मिरची भजी, कांद्याचे थालीपीठ, कांद्याचा झणझणीत झुणका, भरलेली वांगी, वांग्याचे भरीत कांद्याच्या पातीची भाजी, चटण्या आदी पदार्थ तयार मनसोक्तपणे आस्वाद घेत हा दिवस साजरा केला जातो.
अलीकडे सोशल मीडियावर वर्च्युअल मेळा साधला गेला. कांदे नवमीचा हा खवय्यांचा आनंद फेसबुक, व्हिडिओ कॉल, व्हाॅट्सॲप, स्टेटस या माध्यमातून अनेकांनी लुटला. कांदाभजीची लज्जत लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांच्याच पसंतीस उतरते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवार लॉकडाऊनच्या निर्बंधामुळे सामूहिक पार्टींना परवानगी नसल्याने आता घरातल्या घरातच कांदे भजीचा स्वाद खवय्यांना चाखावा लागला. नेहमीच्या कट्ट्यावरही कांदा भजी मिळणार नसल्याने खवय्यांनी "होम मिनिस्टरां''च्या पाककलेतून तळलेल्या भजींवर ताव मारला. रविवारी घराघरातून कांदा, लसणाचा फोडणीचा घमघमीत सुगंध येत होता.
चौकट :-सध्या पावसाचे दिवस असून कोसळणाऱ्या पाऊस सरींनी कांदेभजींचा आनंद नक्कीच द्विगुणित होतो. आम्ही महिला दरवर्षी कांदे नवमी साजरी करतो. यानिमित्ताने महिलांच्या गप्पा रंगतात. कांदे भजी सोबत जेवण व गप्पांचा आस्वाद घेताना आनंद वाटतो. लॉकडाऊनमुळे यंदा आनंद हिरावला गेला; मात्र उमेद संपली नाही. पुढील वर्षी अधिक उत्साहाने कांदेनवमी साजरी करू. सुरक्षिततेसाठी कांदे भजीची मज्जा यावेळी घरीच घेतली व मोबाईलवर गप्पा केल्यात.
अमृता अहिरे, गृहिणी