नाशिक : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत नाशिक रोड येथील मोहित जितेंद्र पाटील याने शंभर पर्सेंटाईलसह यश संपादन करून, राज्यातील शंभर पर्सेंटाईल मिळविणाऱ्या २८ विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले आहे. त्याने जीवशास्त्र व रसायनशास्त्र विषयात शंभरपैकी शंभर पर्सेंटाईल मिळविले असून, भौतिकशास्त्रात ९९.९२ पर्सेंटाईलसह त्याने राज्यातील अव्वल विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले आहे, तर चिंतन देवांग याने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात शंभर पर्सेंटाईल मिळविले असून, जीवशास्त्रात ९९.८५ पर्सेंटाईलसह एकूण ९९.९७ पर्सेंटाईल मिळवून लक्षवेधी यश संपादन केले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर झाला असून, यंदा पीसीएम गटातून तब्बल ११ विद्यार्थ्यांना तर पीसीबी गटातून १७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाईल मिळाले आहेत. यात नाशिकच्या मोहित पाटील या विद्यार्थ्याने स्थान मिळविले आहे नाशिक जिल्ह्यातून एमएच सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेला २० ते २५ सप्टेंबरच्या दरम्यान पहिल्या टप्प्यात पीसीएम ग्रुपमधून १६ हजार ७८८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ८७.३ टक्के म्हणजेच १४ हजार ६६० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली, तर २ हजार १२८ विद्यार्थी या परीक्षेला अनुपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या पीसीबी ग्रुपच्या परीक्षेला प्रविष्ठ १५ हजार ७७० पैकी १२ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, तर २ हजार ९४४ विद्यार्थी गैरहजर होते. ही परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त परीक्षा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात पीसीएन गटातून ९८ तर पीसीबी गटातून १२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दरम्यान, निकाल विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परीक्षेत नाशिकमधील शेकडो विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.
इन्फो-
मोहितचे एमबीबीएस करण्याचे स्वप्न
राज्यातील शंभर पर्सेंटाईल मिळविणाऱ्या २८ विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविणारा मोहित पाटील याचे वडील जितेंद्र पाटील शासकीय आयटीआयमध्ये प्रशिक्षक आहेत, तर आई कविता पाटील गृहिणी आहे. दोघांनीही अभ्यासासाठी नियमित प्रोत्साहन दिल्यामुळेच आपण हे यश संपादन करू शकल्याची प्रतिक्रिया मोहित पाटील याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. यापुढे नीटच्या माध्यमातून वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन एमबीबीएस पूर्ण करण्याते स्वप्न असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.