पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे विजेच्या तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे सुमारे एक एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.पाथरे खुर्द शिवारात निर्मलाबाई ज्ञानदेव चिने यांचे गट नंबर ३७६ मध्ये एक एकर उसाचे पीक होते. या शेतातून विजेच्या तारा गेल्या आहेत. खांबांवरील तारा लोंबकळल्याने त्या अतिशय खालून गेल्या आहेत. या वीजवाहक तारांमध्ये वाऱ्यामुळे घर्षण होऊन ठिणग्या उसाच्या पिकावर पडल्याने चिपाडाने पेट घेतल्याचे चिने यांनी सांगितले. दुपारी उन्हाच्या उष्णतेमुळे व वाऱ्याने उसाचे क्षणार्धात पेटले. उसाने पेट घेतल्याचे पाहून रवि गावडे, राजेंद्र दवंगे, दादासाहेब दवंगे, नामदेव गावडे, विकास चिने, कृष्णा चिने यांनी संबंधित शेतकऱ्याशी संपर्क साधला. तोपर्यंत उसाने चांगलाच पेट घेतला होता. वीजवाहिन्या लोंबकळत असल्याची तक्रार वीज वितरण कंपनीकडे करण्यात आली होती, असे चिने यांनी सांगितले. तथापि, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप चिने यांनी केला आहे. वीज वितरण कंपनीने वेळीच खबरदारी घेतली असती तर उसाचे पीक जळाले नसते ्रअसा दावाही त्यांनी केला आहे. तलाठी के.एम. परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. (वार्ताहर)
पाथरे खुर्द शिवारात एक एकर ऊस जळून खाक
By admin | Updated: March 26, 2016 23:02 IST